अशा पद्धतीने घरबसल्या घेऊ शकता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन


पुणे : राज्याभोवती आवळलेला कोरोनाचा फार्स दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत असल्यामुळे काही दिवसांवर येऊन ठेपलेला गणेशोत्सव साधेपणात साजरा केला जाणार आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने सार्वजनिक गणेशोत्सवास परवानगी नाकारली असल्यामुळे साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय गणेश मंडळांनी स्वत;हून पुढाकार घेत घेतला आहे. त्यानुसार आता पुण्यातील जगप्रसिद्ध दगडूशेठ गणपती ट्रस्टनेही यंदाचा गणेशोत्सव मंदिरातच साजरा होईल, असे जाहीर केल्यामुळे गेल्या 127 वर्षांच्या परंपरेत प्रथमच खंड पडणार आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ ट्रस्टच्या वतीने १२८ व्या वर्षानिमित्त गणेश चतुर्थीला शनिवार, दिनांक २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. हा सोहळा वेदमूर्ती मिलींद राहुरकर आणि वेदमूर्ती नटराज शास्त्री यांच्या पौरोहित्याखाली संपन्न होईल, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली.

रविवार, दिनांक २३ ऑगस्ट रोजी पहाटे ६ वाजता ॠषीपंचमीनिमित्त प्रतिनिधीक स्वरुपात महिला अथर्वशिर्ष पठण आणि श्री गणेशाची महाआरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. कोरोनामुळे घरी राहून साधेपणाने आपण गणेशोत्सव साजरा करीत आहोत. यंदा सार्वजनिक प्रकारे कार्यक्रम करता येत नसला तरी ही अथर्वशीर्ष पठणाची परंपरा खंडित होणार नाही. ट्रस्टच्या @dagdushethganpati या यूट्यूब चॅनलवर लाईव्ह होणार आहे. घरबसल्या यामध्ये सहभागी होण्यासाठी व रजिस्टर करण्यासाठी या लिंकवर क्लिक करावे.

ट्रस्टतर्फे ऑनलाईन पद्धतीने अनेक धार्मिक, सांस्कृ तिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सोमवार, दिनांक ३१ ऑगस्टपर्यंत दररोज दुपारी ४ वाजता ट्रस्टच्या यूट्यूब चॅनलवरुन निरुपणकार गाणपत्य स्वानंद पुंड शास्त्री, वणी, यवतमाळ हे अथर्वशिर्षावर निरुपण करणार आहेत. तसेच स्वरपूजा या ऑनलाईन कार्यक्रमातून दिनांक ३१ ऑगस्टपर्यंत दररोज विविध कलाकारांनी यापूर्वी श्रीं ची चरणी अर्पण केलेली गायनसेवा गणेशभक्तांना घरी बसून अनुभवता येणार आहे.

श्रीं चे ऑनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, //bit.ly/Dagdusheth-Live, iOS : //bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: //bit.ly/ Dagdusheth _ Android_App या लिंकवर उत्सवकाळात २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. मंदिरामध्ये प्रवेश न करता बाहेरुनच बाप्पांचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. तसेच हार, फुले, पेढे, नारळ देखील स्विकारले जाणार नाहीत आणि प्रसाद दिला जाणार नाही. तरी भाविकांनी ऑनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.