सुशांत प्रकरणी ‘सर्वोच्च’ निकालानंतर गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची भाजप नेत्याकडून मागणी


मुंबई – अनेक माध्यमातून सुशांत सिंह राजपूत याच्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी जोर धरत असतानाच सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात आज सुनावणी झाली. त्यानुसार, सीबीआयने या घटनेचा तपास करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. त्याचबरोबर सीबीआयला मुंबई पोलिसांनी पूर्णपणे सहकार्य करावे, अशा सूचना देखील न्यायालयाने केल्या आहेत. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

सुशांतच्या प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली होती. तसेच, ही मागणी भाजपच्या अनेक नेत्यांनी देखील लावून धरली होती. विशेष म्हणजे सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारे पत्र गृहमंत्री अनिल देशमुख यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनीही दिले होते. पण ही मागणी गृहमंत्र्यांनी फेटाळून लावली होती. त्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने आज सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा सीबीआय तपास करण्याचे आदेश दिले आहेत. त्यावरुन भाजप नेत्यांनी गृहमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी मागणी केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंवरुन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मेन्शन करत सोमैय्या यांनी ही मागणी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश