पवारांच्या “त्या” वक्तव्यावर निलेश राणेंचे भाष्य


मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येची चौकशी सीबीआयकडे देण्यात यावी अशी मागणी केल्यानंतर आजोबा शरद पवार यांनी पार्थ यांच्या या मागणीवर चांगलीच कानउघडणी केली. माझ्या नातवाच्या मागणीला मी कवडीची किंमत देत नाही अशा शब्दात पवारांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर यावर आता राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यातच भाजपचे नेते निलेश राणे यांनी एक आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररित्या काढू शकतात हे पहिल्यांदाच पाहिल्याचे म्हटले आहे.

आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत निलेश राणे यांनी एक ट्विट केले आहे. ज्या भाषेत पवार साहेबांनी स्वतःच्या नातवाला फटकारले ते वाचून व ऐकून धक्का बसला. आपल्या नातवाची लायकी एक आजोबा अशा प्रकारे जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच बघितले. पवार साहेब हे जाहीर करा हा राग पार्थने राम मंदिरला समर्थन दिले म्हणून होता की सुशांत प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली म्हणून? असा सवाल देखील निलेश राणे यांनी पवारांना केला आहे.

त्याचबरोबर कालच निलेश राणे यांचे बंधू आमदार नितेश राणे यांनी देखील पार्थ पवार यांचे कौतुक केले होते. ‘आज परत सांगतो, पार्थ लंबी रेस का घोडा है… थांबू नकोस मित्रा!’ असे ट्विट नितेश यांनी केले होते.