भूमिपूजनाला मोदींसोबत मंचावर हजर असणारे राम जन्मभूमी ट्रस्टचे प्रमुख कोरोना पॉझिटिव्ह


नवी दिल्ली – अयोध्येतील राम जन्मभूमी ट्रस्टचे प्रमुख महंत नृत्यगोपाल दास यांना कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले असून त्यांची कोरोना चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. विशेष म्हणजे महंत नृत्यगोपाल दास गेल्या आठवड्यात अयोध्येत पार पडलेल्या राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत मंचावर उपस्थित होते.

अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाचा ५ ऑगस्ट रोजी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठराविक लोकांनाच निमंत्रण देण्यात आले होते. फक्त पाच लोकांनाच मंचावरही परवानगी होती. यामध्ये महंत नृत्यगोपाल दास यांचा समावेश होता. यावेळी त्यांच्यासोबत मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील हजर होते. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यावेळी अनेकदा महंत नृत्यगोपाल दास यांच्याजवळ गेले होते. महंत नृत्यगोपाल दास आणि नरेंद्र मोदी यांच्यासहित मंचावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचलाक मोहन भागवत आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल उपस्थित होत्या.