हिंदू देवी-देवतांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नेत्याचे आपने केले निलंबन


नवी दिल्ली – आम आदमी पक्षाचे बडे नते आणि माजी आमदार जर्नेल सिंग यांना हिंदू देवी-देवतांबाबत फेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट करणे महागात पडले असून जर्नेल सिंग यांच्या फेसबूकवरील पोस्टमुळे वाद वाढल्यानंतर आम आदमी पक्षाने त्यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून निलंबित केले आहे. राजौरी गार्डन विधानसभा मतदारसंघाचे जर्नेल सिंग यांनी प्रतिनिधित्व केले होते.

११ ऑगस्ट रोजी फेसबूकवर जर्नेल सिंग यांनी हिंदू देवी-देवतांबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर पक्षाने जर्नेल सिंग यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तसेच त्यांचे प्राथमिक सदस्यत्व निलंबित का करण्यात येऊ नये अशी विचारणा केली होती. दरम्यान, आता या प्रकरणाचा तपास होईपर्यंत जर्नेल सिंग यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून आपने निलंबित केले आहे.

पण जर्नेल सिंग यांनी या प्रकाराबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, काल माझा फोन ऑनलाइन क्लाससाठी माझ्या मुलाकडे होता. त्याने एक पोस्ट कॉपी पेस्ट केली. पण हा प्रकार लक्षात येताच ती पोस्ट मी तात्काळ डिलीट केली. मी देवाच्या सर्व नावांचा, राम, गोविंद, केशव, सदाशिव सर्वांचा सन्मान करतो आणि गुरू तेगबहादूर यांच्या सिद्धांतावर चालतो, असे म्हटले आहे.