गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण सूचना


सिंधुदुर्ग – आता अवघ्या काही दिवसांवर आपल्या सर्वांचा लाकडा सण गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. पण यावर्षीच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्यामुळे कोकणात या सणासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सरकारने क्वारंटाईन तसेच कोरोनाबाबतच्या नियम आणि अटींमध्ये अनेक प्रकारची शिथिलता दिली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी तसेच स्थानिक रहिवाशांसाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत प्रसिद्ध केलेल्या आदेशानुसार १२ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात एसटीने येणाऱ्या चाकरमान्यांना १० दिवसांचे होम क्वारंटाईन लागू राहणार आहे. त्याचबरोबर ई-पासची आवश्यकता एसटीने येणाऱ्या चाकरमान्यांसाठी नसेल. पण खासगी वाहनांनी येणाऱ्यांसाठी ई-पास अनिवार्य असणार आहे. तसेच १२ ऑगस्टनंतर गावी येणाऱ्या चाकरमान्यांना ४८ तास अगोदर कोरोना टेस्ट करून घ्यावी लागेल. तसेच त्याचा अहवाल निगेटिव्ह असावा लागेल. त्याबरोबरच असा अहवाल घेऊन येणाऱ्या चाकरमान्यांना होम क्वारंटाईन बंधनकारक असेल.

याबरोबरच जिल्हाधिकाऱ्यांनी सिंधुदुर्गवासियांनाही गणेशोत्सवासाठी महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. त्यामध्ये यावर्षी गणेशोत्सव हा कमीत कमी दिवसांचा साजरा करावा. गणपतीची पूजा पुरोहितामार्फत न करता स्वत: करावी किंवा तंत्रज्ञानाचा वापर करून करावी. आगमन विसर्जनाला मिरवणूक काढू नये. आरती, भजने, फुगड्या, गौरी, वसा आदी कार्यक्रम घरच्या घरी गर्दी होऊ न देता करावेत. कार्यक्रमानिमित्त घरोघरी भेटी देणे टाळावे. गावातील वाडीतील गणपतींचे विसर्जन एकत्रित करू नये.

तहसिलदारांची परवानगी घेऊनच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी भपकेबाजपणा टाळून छोट्या मंडपात गणेशोत्सव साजरा करावा. मंडपात गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. दर्शनाला येणाऱ्या भाविकांची नोंद ठेवावी म्हणजे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे शक्य होईल, तसेच ऑनलाइन दर्शनावरच भर द्यावा, दर्शनाला येणाऱ्या भाविकांमध्ये सोशल डिस्टंसिंग पाळले जाईल याची काळजी घ्यावी लागले.