राज ठाकरे यांचे जिम चालकांना जिम सुरु करण्याचे आवाहन


मुंबई – राज्यात लागू असलेला लॉकडाऊन आता मिशन बिगीन अगेन अंतर्गत उठवण्यात येत आहे. त्यानुसार काही प्रमाणात शिथीलता देऊन काही उद्योग धंदे सुरु करण्यात येत आहेत. पण यात अद्याप राज्यातील जिम सुरु करण्यात आलेल्या नाहीत. आता याच मुद्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला काही प्रश्न विचारत जिम चालकांना तुम्ही जिम सुरु करा, किती दिवस लॉकडाउनमध्ये काढणार आहात? असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जिम चालकांना जिम सुरु करण्याचे आवाहन केले. अजूनही जिम चालकांना जिम सुरु करण्याची परवानगी राज्य सरकारने न दिल्यामुळे या व्यवसायाशी संबंधित असलेले लोक मागच्या काही दिवसांपासून राज्यात आंदोलन करत आहेत.

लॉकडाऊनमुळे जिम व्यवसायाशी संबंधित अनेकांच्या रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जिम चालक आणि मालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्या पार्श्वभूमीवर आज कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. यासंदर्भातील वृत्त टीव्ही ९ या वृत्तवाहिनीने दिले आहे.

गोल्फ, टेनिस एवढे फिजिकल डिस्टन्सिंग कुठल्याच खेळात नाही पण ते सुद्धा बंद आहे, याकडे राज यांनी लक्ष वेधले. बाजार सुरु आहेत. सगळीकडे सगळया गोष्टी सुरु आहेत. पण राज्यात सध्या मूर्खाचा बाजार सुरु आहे. केंद्र सरकार सांगते सुरु करा, पण राज्य सुरु करायला तयार नाही. मागे केंद्राने विमानतळ सुरु करायला सांगितले पण त्यासाठी राज्याची तयारी नव्हती. राज्याला वेगळी अक्कल आहे का ? असा सवाल त्यांनी केला.