केदार शिंदेंचा सरकारला टोला; न्यूझीलंडमधील ‘देवी’ जागृत, मला तिथे जाऊन राहायचे


जगावर ओढावलेल्या कोरोना व्हायरसमुळे आता पर्यंत 2 कोटी 02 लाख 54 हजार 685 लोक बाधित झाले आहेत, तर 7 लाख 38 हजार 930 लोकांना आपला जीव देखील गमावला आहे. तर दूसरीकडे आपल्या देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. सर्वाधिक कोरोनाबाधित असलेल्या देशांच्या यादीत आपल्या तिसऱ्या क्रमांकावर असून देशातील कोरोनाबाधितांची संख्या 22 लाख 67 हजार 153 वर पोहोचली आहे. त्यापैकी 15 लाख 81 हजार 640 रुग्णांनी यशस्वीरित्या मात केली आहे, तर 45 हजार 353 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जगभरातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या आकडेवारी सोबतच एक दिलासादायक बातमी समोर आली असून मागील 100 दिवसांत न्यूझीलंडमध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण सापडलेला नाही. त्यावरून सरकारला मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी टोला लगावला आहे.

न्यूझीलंडने कोरोनामुक्त होण्याचा मान पटकावला होता, पण तेथील सरकारने प्रवासावर असलेली बंदी हटवल्यानंतर तेथे पुन्हा कोरोनाबाधित सापडल्यानंतर पुन्हा कडक लॉकडाऊन करण्यात आला. हे सर्वकाही न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डेन यांच्या सक्षम नेतृत्वामुळे आणि योग्य धोरणांमुळे शक्य झाल्यामुळे त्यांचे सध्या कौतुक होत आहे. जॅसिंडा आर्डेन यांचे कौतुक करणारे केदार शिंदे यांनीही ट्विट केले आणि त्यावरून त्यांनी सरकारला टोला देखील लगावला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, न्यूझीलंडमध्ये जाऊन मला रहायचये. ते कसे शक्य होईल याची माहिती नाही. पण न्यूझीलंडमध्ये मागील १०० दिवसात एकही कोरोनाबाधित रूग्ण सापडलेला नाही. त्यांच्या देशाच्या महिला पंतप्रधान आहेत. तेथील देवी जागृत आहे आणि आम्ही येथे फक्त ‘बेटी पढाओ, बेटी जगाओ’चे फतवेच काढत राहणार!

केदार शिंदे यांना या ट्विटनंतर ट्रोल केले गेले. केदार शिंदे यांनी देखील ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले. त्यांनी लिहिले की, काही लोकांच्या मेंदूत केमिकल लोच्या झाला आहे. या विषयी काहीच माहीती नसावी. एखादी पोस्ट टाकली की उत्तरादाखल हे बुध्दीचे प्रदर्शन मांडणार. एक मोबाईल, आईबापाने भरलेला फ्री डाटा, भक्तीची डोळ्यावर पट्टी बांधून यांची मोबाईलवर बोटे फिरतात! कृष्ण जन्मून मर्दन करावे आता!