मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्री यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; महिलेविरोधात गुन्हा दाखल


मुंबई : मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट लिहिणार्‍या महिलेविरोधात मुंबई सायबर विभागात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा युवा सेनेचे पदाधिकारी आणि वकील धर्मेंद्र मिश्रा यांच्या तक्रारीनंतर नोंदवण्यात आला असून सुनयना होले या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सायबर विभाग करीत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर गेले काही दिवस ट्विटरवर अतिशय खालच्या दर्जाची टीका टिप्पणी केली जात होती. तर उद्धव ठाकरे यांचा फोटो एडिट करून मौलवी झाल्याचे दाखवण्यात आला आहे. या पोस्टमुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होत असल्याचा आरोप अॅड. धरम मिश्रा यांनी केला आहे.

शिवसेनेने राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर भाजपसोबत युती तोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत मिळून सत्ता स्थापन केली. त्या घटनाक्रमापासून ते सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणापर्यंत सर्व प्रसंगांवर टीका टिप्पणी पोस्टमधून केली जात होती. काही पोस्टमध्ये तर अतिशय खालच्या भाषेचा वापर केला गेला होता, तर काहींमध्ये मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख सुद्धा केला गेला. त्यांच्या विरोधात शिवसैनिकांनमध्ये तीव्र नाराजी होती आणि त्याचे प्रतिसादही उमटत होते. नालासोपारामधील युवा सेनेचे विभाग अधिकारी रोहन चव्हाण यांनी नालासोपारा पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात महिलेला अटक झाली असून तिला जामीनावर सोडण्यात आले असून सायबर विभाग तिचे ट्विटर अकाउंट मॉनिटर करत आहे आणि अकाउंटची पडताळणी करून सायबर विभाग पुढील तपास करत आहे.