‘देशाच्या अंतर्गत प्रकरणात हस्तक्षेप करू नका’, काश्मिरवर बोलणाऱ्या टर्कीला भारताने सुनावले

जम्मू-काश्मिरला लागू असलेले कलम 370 हटवल्याच्या घटनेला काल एक वर्ष पुर्ण झाले. यासंदर्भात बोलताना टर्कीने काश्मिरमधील कलम 370 हटवल्याने या क्षेत्रात शांती आलेली नाही असे म्हटले होते. आता या वक्तव्यावर भारताने कठोर शब्दात टर्कीला उत्तर दिले आहे.

भारतीय परराष्ट्र मंत्रालय टर्कीला उत्तर देताना म्हणाले की, त्यांचे हे वक्तव्य चुकीचे, पक्षपाती आणि गरज नसलेले आहे. आमची टर्की सरकारला विंनती आहे की त्यांनी आधी जमिनीवरील स्थिती जाणून घ्यावी.

सोबतच भारताने देशाच्या अंतर्गत प्रकरणात हस्तक्षेप करू नये, असे स्पष्टपणे टर्कीला सुनावले आहे. काही दिवसांपुर्वी टर्कीचे राष्ट्रपती रेसेप तैयप एर्दोआन यांनी काश्मिरची तुलना पॅलेस्टाईनसोबत करत भारत कोरोना संकटाच्या काळात काश्मिरमध्ये अत्याचार करत असल्याचे म्हटले होते. सोबतच त्यांनी काश्मिर मुद्यावर टर्की पाकिस्तानसोबत उभा असल्याचे म्हटले होते.

काश्मिरमधील कलम 370 हटविण्याला एक वर्ष पूर्ण झाल्यावर टर्कीने म्हटले की, जम्मू-काश्मिरला विशेष दर्जा देणार्‍या भारतीय घटनेतील कलम रद्द केल्यापासून या प्रदेशातील परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. 370 हटवल्याने तेथे शांतता आलेली नाही.