टीक-टॉकवर बंदी घालणाऱ्या आदेशावर ट्रम्प यांची मोहर


वॉशिंग्टन – सुरक्षेच्या कारणास्तव काही दिवसांपूर्वी भारत सरकारने टीक-टॉकसह अन्य 59 चीनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर अशी मागणी अन्य देशांमधूनही पुढे येत होती. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टीक-टॉकवर बंदी घातली जाणार असल्याचे काही दिवसांपूर्वी म्हटले होते. यानंतर आता टीक-टॉक आणि वी-चॅट या कंपन्यांसोबत करण्यात येणाऱ्या व्यवहारांवरदेखील निर्बंध घालण्यात आले आहेत.

तर दुसरीकडे मायक्रोसॉफ्ट किंवा इतर कोणत्याही कंपन्यांनी हा व्यवसाय खरेदी न करण्याच्या शक्यतेकडे पाहता देशात त्यांनी टीक-टॉकवर बंदी घालण्यासाठी १५ सप्टेंबरची मुदत दिली आहे. त्यांनी यासंदर्भात कार्यकारी आदेशावर स्वाक्षरीदेखील केली आहे.

गुरूवारी संध्याकाळी चिनी अॅप टीक-टॉक आणि वी-चॅटवर ४५ दिवसांच्या आत बंदी घालण्याच्या आदेशावर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली. यापूर्वी अमेरिकेतील कर्मचाऱ्यांच्या टीक-टॉक वापरण्यावर बंदी घालणाऱ्या आदेशाला सीनेटने मान्यता दिली होती. टीक-टॉकसारख्या अविश्वासू अॅपद्वारे डेटा जमवला जाणे हे देशाच्या सुरक्षेविरोधात असल्याचे ट्रम्प यांनी आदेशावर स्वाक्षरी केल्यानंतर म्हणाले.

चीनच्या कम्युनिस्ट पक्षाला डेटा मिळवल्यामुळे अमेरिकेतील लोकांच्या खासगी आणि मालकीची माहिती मिळते. यामुळे चीन अमेरिकेतील फेडरल कर्मचारी आणि कंत्राटदारांच्या ठिकाणांचा मागोवा घेऊ शकते. त्याचबरोबर खासगी माहितीचा वापर करून कम्युनिस्ट पक्ष धोका निर्माण करू शकतो आणि कॉर्पोरेट हेरगिरीदेखील करू शकतो, असे ट्रम्प म्हणाले.