उच्च न्यायालयाने बदलला ठाकरे सरकारचा निर्णय; 65 वर्षांपुढील कलाकारांना दिली शूटिंगची परवानगी


मुंबई : 65 वर्षांवरील कलाकारांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शूटिंगची परवानगी देण्यास मनाई केली होती. तसेच मालिका अथवा चित्रपटांच्या चित्रीकरणादरम्यान सोशल डिस्टन्सिंग नियम पाळण्याची अट घातली होती. यामुळे 65 वर्षांपुढील कालाकार नाराज झाले होते. या कलाकारांनी उच्च न्यायालयात निर्णयाविरोधात धाव घेतली होती. त्यांना आज न्य़ायालयाने परवानगी दिली आहे.

६५ वर्षांवरील ज्येष्ठांना चित्रीकरणात भाग घेऊ देण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून मनोरंजनसृष्टी करत होते. पण सरकारने ही मागणी फेटाळून लावली होती. पण सरकारच्या या निर्णयावर ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी नाराजी व्यक्त केली होती. आपली काळजी घेऊन 65 वर्षापुढील कलाकार काम करतील. त्यामुळे सरकारने त्यांना परवानगी द्यावी, असेही गोखले म्हणाले होते. जर ज्येष्ठ नागरीकांना इतर काम करण्यापासून मज्जाव नाही, तर शूटींगवर जाण्यास बंदी अयोग्य असल्याचे मत उच्च न्यायालयाने नोंदविले आहे. ज्येष्ठ कलाकार प्रमोद पांडे आणि ‘इंपा’ यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे.

उच्च न्यायालयाने ज्येष्ठ कलाकारांना चित्रिकरणासाठी दिलेले नियम…

  • चित्रीकरण सुरू झाल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी चांगल्या दर्जाचे मास्क आणि ग्लोव्हज वापरावेत.
  • हस्तांदोलन करणे, मिठी मारणे अथवा किस करणे या गोष्टी टाळणे गरजेचे आहे.
  • प्रत्येकाने एकमेकांमध्ये अधिकाधिक अंतर राखावे.
  • चित्रपटाच्या सेटवर, प्रोडक्शन हाऊसच्या ऑफिसेसमध्ये, स्टुडिओमध्ये सिगरेट पिताना ती एकमेकांसोबत शेअर करू नये.
  • सेट, ऑफिसेस वेळोवेळी सॅनिटाईज करावीत.
  • चित्रीकरणाला उपस्थित असलेल्या लोकांची महिन्यातून एकदा चाचणी करणे अनिर्वाय असेल.
  • साठ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांना घरून काम करण्याची मुभा द्यावी.
  • चित्रीकरण सुरू झाल्यावर सेटवर कमीतकमी तीन महिने तरी साठ वर्षांवरील लोकांकडून काम करून घेऊ नये.
  • चित्रीकरणाच्या सेटवर चित्रीकरण सुरू व्हायच्याआधी सगळ्यांना ४५ मिनिटे आधी पोहोचावे लागेल.
  • सेटवर बाथरूम, वॉश बेसिंग स्वच्छ करून द्यावीत.
  • केसाला वापरला जाणारा विग वापरण्याआधी आणि नंतर देखील धुवावा.
  • प्रत्येकाने स्वतःचाच मेकअप किट वापरावा.
  • मेकअपमन आणि हेअर स्टायलिस्ट यांनी सतत हातात ग्लोव्हज घालणे आणि मास्क घालणे बंधनकारक आहे.