जाणून घ्या सोशल मीडियात व्हायरल झालेल्या आदित्य ठाकरेंच्या फोटोमागील सत्य


मुंबई – सध्या ट्विटरवर राज्याचे पर्यटनमंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे याचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत आदित्य ठाकरे हे गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसले असून त्यांच्या बाजूला एक महिला अल्याचे दिसत आहे. त्यावरुन फोटोमधील ही माहिला म्हणजे सुशांत सिंह राजपूतची प्रेयसी रिया चक्रवर्ती असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान मुंबई पोलीस आणि बिहार पोलिसांमधील सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणावरुन वाद समोर येत असतानाच सुशांतची कथित प्रेयसी रिया चक्रवर्तीसोबत आदित्य ठाकरे हे फिरत असल्याचा दावा काही नेटकऱ्यांकडून करण्यात आला आहे.

सुशांत हा मूळचा बिहारचा रहिवाशी असल्यामुळेच बिहार पोलिसांनी आता त्याच्या वडीलांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. यावरुनच सोशल नेटवर्किंगवरही मागील काही दिवसांपासून नेटकऱ्यांमध्येही महाराष्ट्र सरकार विरुद्ध बिहार सरकार आणि बरोबर कोण मुंबई पोलीस की बिहार पोलीस असा वाद सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. अगदी हॅशटॅगपासून ते व्हिडिओ आणि फोटोच्या माध्यमातून दोन्ही बाजूचे समर्थक त्यांची बाजू मांडताना दिसत आहेत.

याच दरम्यान महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधताना उत्तर भारतामधील काही ट्विटर हॅण्डलवरुन आदित्य ठाकरेंचा हा फोटो व्हायरल करण्यात आला आहे. सुशांतच्या प्रेयसीबरोबर म्हणजेच रियाबरोबर आदित्य ठाकरेच फिरत असल्याचे सांगत हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. या प्रकरणामध्ये महाराष्ट्र सरकारला सीबीआयची चौकशी नको असल्यामुळे हे जुने फोटो व्हायरल केले जात आहेत.

हा फोटो उमानंदन मिश्रा या अकाउंटवरुन ट्विट करण्यात आला असून उद्धव ठाकरेंचा मलुगा जर सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्तीसोबत फिरत आहे तर सुशांतच्या हत्येचा तपास सीबीआयकडून कसा केला जाईल?, अशी कॅप्शन या फोटोला देण्यात आली आहे. दरम्यान तीन हजार ९०० हून अधिक जणांनी हा फोटो रिट्विट केला आहे. त्याचप्रमाणे अंकिता दवे या नावाने असणाऱ्या ट्विटर हॅण्डलवरुनही हाच फोटो आणि याच कॅप्शनसहीत शेअर करण्यात आला आहे. हा फोटो पाच हजारहून अधिक जणांनी रिट्विट केला आहे.

पण व्हायरल होत असलेल्या फोटोमधील महिला ही अभिनेत्री दिशा पटनी असून मागील वर्षी म्हणजेच २०१९ साली आदित्य आणि दिशा एकत्र डिनरासाठी गेलेले असतानाच हा फोटो काढण्यात आला होता. त्यामुळेच सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून केला गेला पाहिजे अशी मागणी करण्यासाठी खोट्या माहितीसहित आदित्य आणि दिशा यांचा हा फोटो व्हायरल करण्यात येत असल्याचे स्पष्ट होत आहे.