वयाची खोटी माहिती देणे क्रिकेटपटूंना पडणार महागात, बीसीसीआय घालणार 2 वर्षांची बंदी

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (बीसीसीआय) क्रिकेटमध्ये वय आणि डोमेसाईलमध्ये फसवणुकीसंदर्भात कठोर पाऊल उचलले आहे. या अंतर्गत जर एखाद्या खेळाडूने आपले वय लपवल्यास दोन वर्षांची बंदी घातली जाईल. बीसीसीआयचे नवीन नियम 2020-21 सीझनमध्ये आपल्या सर्व वयोगटातील स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना लागू असतील.

नवीन नियमांनुसार, जर खेळाडूने आपण वयाची खोटी माहिती दिल्याचे मान्य केल्यास, तर खेळाडूला काहीही शिक्षा होणार नाही. मात्र लपवल्यानंतर खेळाडू दोषी आढळल्यास बीसीसीआय खेळाडूवर दोन वर्षांची बंदी घालेल.

खेळाडूने आपली चूक मान्य करून खरे वय सांगितल्यास त्याला स्पर्धेत खेळू दिले जाईल. यासाठी खेळाडूंना स्वतःची स्वाक्षरी असलेले पत्र/ईमेल पाठवावा लागेल. सोबतच 15 सप्टेंबरपर्यंत संबंधित विभागात खऱ्या जन्मतारखेची कागदपत्रे जमा करावी लागतील.

सोबतच डोमेसाईलमध्ये देखील फसवणूक करणाऱ्या वरिष्ठ महिला आणि पुरुषांवर देखील दोन वर्षांची बंदी घातली जाईल. बीसीसआयच्या अंडर-16 स्पर्धेत केवळ 14-16 वयोगटातील खेळाडू सहभागी होऊ शकतात. प्रामुख्याने पुढील स्थानिक स्पर्धांसाठी हे नियम लागू असतील. याबाबत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले की, सर्वांना समान व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. बीसीसीआय वयासंबंधी फसवणूक रोखण्यासाठी पावले उचलत आहे व आता पुढील सीझनसाठी अधिक कठोर नियम लागू केले आहेत. जे लोक स्वतः चूक मान्य करणार नाहीत, त्यांना कठोर शिक्षा होईल.