Video: त्या आजीबाईंच्या मदतीसाठी पुढे सरसावला सोनू सुद


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात हजारो स्थलांतरित मजूरांची अभिनेता सोनू सुदने घरवापसी केली. सोनू सूद हा लॉकडाऊन काळात मुंबईतून परराज्यात आपल्या गावी जाणाऱ्यांसाठी एकाप्रकारे देवदूतच ठरला. दरम्यान अद्यापही त्याच्या या मदतकार्याचा ओघ सुरुच आहे. त्याचबरोबर आता या स्थलांतरित मजूरांच्या रोजगाराची देखील व्यवस्था सोनूच करणार आहे. त्यातच आता आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सोनूने एक व्हिडिओ शेअर करत, वृद्ध आजीबाईंना ऑफरच देऊ केली. त्यांच्याकडून महिलांना स्व-संरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचा विचार सोनूने केला आहे.

आपल्या सेवाभावी वृत्तीमुळे सोनू सुद सोशल मीडियावरही सुपरहिरो ठरला असून त्यातच दररोज त्याच्या समाजसेवेची व्याप्ती वाढतच आहे. एका गरीब कुटुंबाने मुलीच्या ऑनलाईन शिक्षणाला गरजेचा असणारा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी आपली गाय विकली होती. सोनूने आता, ती विकलेली गाय त्या कुटुंबियांना परत मिळवून देण्याचे काम हाती घेतले आहे. त्यानंतर, आणखी एक व्हिडिओ आज सोनूने शेअर केला आहे. त्यामध्ये एक वयोवृद्ध आजीबाई पोटाची खळगी भरण्यासाठी भररस्त्यात दोन हातांनी काठ्या फिरवून कसरत करताना दिसत आहे.

सोनूला या आजीबाईचा व्हिडिओ पाहून चांगली आयडिया सूचली आहे. मी महिलांसाठी, मुलींसाठी या आजीबाईंना सोबत घेऊन स्व-संरक्षणाचे ट्रेनिंग देणारे स्कुल सुरू करु इच्छित आहे. या आजीबाई व त्यांच्या संपर्काबद्दल कुणी मला माहिती देईल का, असे सोनूने म्हटले आहे. आपल्या समाजसेवेमुळे सोनू सूद कोट्यावधी भारतीयांची मने जिंकत आहे. त्यातच आता त्याने आजीबाईंना दिलेल्या या ऑफरमुळे आणखी भर पडली आहे.