कोरोनाच्या ॲक्टिव्ह केसेसमध्ये पुणे अव्वल स्थानी


मुंबई : राज्यावर ओढावलेले कोरोना या महामारीचे दुष्ट संकट अजूनच गडद होऊ लागले असल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत देखील लक्षणीय वाढ होत आहे. पण या सर्वात दिलासादायक बाब म्हणजे राज्यात कोरोनावर यशस्वी रित्या मात करणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. पण यात धक्कादायक बाब अशी की, सध्या उपचार सुरु असलेल्या (ॲक्टिव्ह केसेस) रुग्णसंख्येमध्ये आता पुणे अव्वल स्थानी आहे. तर ठाणे दुसऱ्या आणि मुंबई तिसऱ्या स्थानावर आहे. 36 हजार 810 सध्या पुण्यात ॲक्टिव्ह केसेस आहेत, ठाण्यात 36 हजार 219 ॲक्टिव्ह केसेस तर मुंबईत 23 हजार 704 अॅक्टिव्ह केसेस आहेत.

राज्यात काल दिवसभरात आज 8 हजार 369 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्यामुळे राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 3 लाख 27 हजार 31 वर पोहचली आहे. काल दिवसभरात 7 हजार 188 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 1 लाख 82 हजार 217 रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. दरम्यान राज्यात एकूण 1 लाख 32 हजार 236 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तर काल राज्यभरात 246 कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

कालपर्यंत पाठवण्यात आलेल्या 16 लाख 40 हजार 644 नमुन्यांपैकी 3 लाख 27 हजार 31 (19.93 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 7 लाख 79 हजार 676 लोक होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 45 हजार 77 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 55.72 टक्के एवढे आहे. राज्यभरात आतापर्यंत 1 लाख 82 हजार 217 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात काल 246 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.75 टक्के एवढा आहे.