उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा प्रोमो; राऊतांच्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांची बेधडक उत्तरे


मुंबई – शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली असून त्याचा प्रोमो त्यांनी आज आपल्या ट्विटर अकाऊंटला शेअर केला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अनेक विषयांवर बेधडकपणे उत्तरे दिली असल्याचे दिसत आहे. याच मुलाखतीत उद्धव ठाकरे आपण डोनाल्ड ट्रम्प नसल्याचे सांगताना, माझ्या माणसांना मी डोळ्यांसमोर पाहू शकत नसल्याचे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन केले आहे. सांगत आहेत.

संजय राऊत यांनी या प्रोमोमध्ये उद्धव ठाकरेंना पहिल्या सहा महिन्यांचा कार्यकाळ, समोर उभी राहिलेली संकटे अशा अनेकांवर प्रश्न विचारलेले दिसत आहेत. उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रात लष्कर बोलावण्याची वेळ आली होती का ? मुंबईच्या रस्त्यावर वडापाव कधी मिळणार ? तसंच मंत्रालयात कमी गेल्याचा होणार आरोप याबंधीही संजय राऊत यांनी विचारले आहे.

संजय राऊत यांच्या प्रश्नांना उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी कोरोनासोबत राहायला सगळ्यांनी शिकले पाहिजे. शहाणे व्हायचे की नाही हे ज्याचे त्याने ठरवावे, पण आपण तरी झाले पाहिजे असे सांगितले आहे. तसेच पहिले सहा महिने आव्हाने घेऊन आले होते. कोरोनाचे संकट कधी संपणार हेच आपल्याला माहिती नाही, असे उद्धव ठाकरे यावेळी सांगत आहेत. उद्धव ठाकरेंनी यावेळी अंतिम परीक्षांसंबंधी सविस्तर भूमिका मांडली असून मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतरच ते नेमके काय बोलले आहेत याचा उलगडा होणार आहे.