
गडचिरोली – राज्याचे ओबीसी कल्याण, मदत व पुनर्वसन मंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत गडचिरोली जिल्ह्यासह राज्यातील सर्व शाळा ३ ऑगस्टपासून सुरु करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
३ ऑगस्टपासून सुरू होणार गडचिरोलीसह राज्यातील शाळा – विजय वडेट्टीवार
सध्याची स्थिती बघता ३ ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा राज्य सरकारचा असून त्यापूर्वी सर्व शाळा सॅनिटायझ करून घ्याव्यात, तसेच शाळांना मास्क, सॅनिटायझर अशा आवश्यक वस्तू तातडीने पुरवाव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.
त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यातील प्रलंबित वनहक्क दाव्यांचा एक महिन्यात निपटारा करावा. वनहक्क दाव्यांच्या मंजुरीबाबत प्रादेशिक स्तरावर मंजुरीचे आदेश असावेत, यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. तसेच ५ हेक्टपर्यंतचे अधिकार उपवनसंरक्षकांकडे ठेवण्याची मागणी केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
जिल्ह्यातील कोरोनास्थिती प्रशासनाचे परिश्रम व जनतेच्या सहकार्यामुळे नियंत्रणात आहे. येत्या आठ दिवसांत जिल्ह्याला आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्यासाठी पुन्हा ५ कोटी निधी प्राप्त होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
