चाहत्यांच्या भावना दुखावल्यामुळे उस्मानाबादमधील बिग बींचे ‘ते’ होर्डिंग्स हटविले


उस्मानाबाद – कोरोनाविषयी जनजागृती करण्यासाठी लावण्यात आलेले अमिताभ बच्चन यांचे होर्डिंग्स उस्मानाबाद जिल्ह्यातील एका गावातून हटविण्यात आले आहेत. गावात ‘जिस डॉन को पकडना मुश्किल ही नहीं, बल्कि नामुमकिन था, उसे कोरोना वायरस ने पकड लिया… ‘अशा आशयाचे काही होर्डिंग्स लावण्यात आले होते. पण बिग बींच्या चाहत्यांच्या यामुळे भावना दुखावल्यामुळे हे होर्डिंग्स हटविण्यात आल्याचे वृत्त ‘एनडीटीव्ही’ने दिले आहे.

कोरोनाची महानायक अमिताभ बच्चन यांना लागण झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांचे काही होर्डिंग्स गावामध्ये लावण्यात आले होते. बिग बींच्या फोटोसोबत यामध्ये त्यांच्या ‘डॉन’ या गाजलेला चित्रपटातील संवाद जनजागृती करण्याच्या उद्देशाने वापरण्यात आला होता. पण त्याची शब्दरचना बदलण्यात आल्यामुळे बिग बींच्या चाहत्यांच्या भावना दुखावल्याचे म्हटल्याहे होर्डिंग हटविण्यात आले.

गावामध्ये जिस डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं, बल्कि नामुमकिन था, त्यालाच कोरोनाने विळख्यात ओढले आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबासाठी घरी रहा आणि विनाकारण घराबाहेर पडून डॉन होण्याचा प्रयत्न करु नका, असे होर्डिंग लावण्यात आले होते. जरी जनजागृतीसाठी हे होर्डिंग असले, तरीदेखील त्यामुळे बिग बींच्या चाहत्यांच्या भावना दुखावल्याचं पाहायला मिळाले.

आम्ही हा बॅनर कोरोनाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या हेतूने डिझाइन केला होता. पण अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांच्या भावनांचा आदर करत आम्ही ते बॅनर हटविल्याचे लोहारा नगर पंचायत मुख्य अधिकारी गजानन शिंदे यांनी सांगितले.