विजयदुर्ग किल्ल्याची पडझड; मुख्यमंत्र्यांनी दिल्या किल्ल्याच्या डागडुजी आणि देखभालीच्या सूचना


मुंबई : दुर्गप्रेमी आणि मुळातच छायाचित्रकाराची शोधक नजर असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग किल्ल्याच्या पडझडीचे वृत्त इन्स्टाग्रामवर टिपले, अन् केंद्रातील भारतीय पुरातत्व खात्याला किल्ल्याच्या डागडुजी आणि देखभालीसाठी पावले उचलण्यासंदर्भात पाठपुरावा करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिवांना दिल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रख्यात छायाचित्रकार आहेत. त्यांनी चित्रित केलेल्या छायाचित्रांचा ‘महाराष्ट्र देशा’ हा संग्रह वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. याशिवाय त्यांचे महाराष्ट्रातील गडकोट किल्ल्यांवर विशेष प्रेम आहे. या प्रेमातून ते दुर्गप्रेमी संघटनेचेही प्रणेते ठरले आहेत. छायाचित्रकार असल्यामुळे इन्स्टाग्राम या छायाचित्रांशी निगडीत समाज माध्यमावरील त्यातही गडकोट किल्ले आणि महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्थळांच्या घडामोडींबाबत ते सजग असतात.

यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इन्स्टाग्रामवर विजयदुर्ग या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलदुर्गाच्या एका बुरुजाची पडझड झाल्याचे लक्षात आले. मुख्यमंत्र्यांनी या पोस्टची तात्काळ दखल घेत, त्यांनी भारतीय पुरातत्त्व खात्याला याबाबत माहिती कळविण्याचे तसेच पडझड रोखण्यासाठी आणि या दुर्गाच्या देखभालीबाबतही केंद्राकडील या खात्याकडे पाठपुरावा करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव यांना त्यांनी सूचना दिल्या आहेत.

इन्स्टाग्रामवर विजयदुर्गच्या पडझडीची दखल घेण्यापासून ते त्याबाबत प्रशासनाला सतर्क करून, थेट भारतीय पुरातत्त्व खात्याकडे पाठपुरावा करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या प्रयत्नामुळे निश्चितच विजयदुर्गच्या या बुरूजाची पडझड रोखणे शक्य होणार. तसेच या जलदुर्गाच्या देखभालीचा मार्गही आणखी सुकर होणार आहे. गडकोट किल्ले हे महाराष्ट्राचे वैभव आहे. ते जतन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक संवेदनशील दुर्गप्रेमी आणि शोधक छायाचित्रकाराच्या नजरेने पुढाकार घेण्यामुळे दुर्गप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.