आज मध्यरात्रीपासून सोलापुरात 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन


सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सातत्याने वाढ होत असल्यामुळे आज मध्यरात्रीपासून सोलापुरात कडक लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. सोलापूर शहर आणि आजूबाजूच्या तालुक्यातील जवळपास 31 गावांमध्ये हा लॉकडाऊन 26 जुलैपर्यंत लागू असणार आहे. दूध, मेडिकल, रुग्णालय या व्यतिरिक्त सर्व आस्थापना या दरम्यान बंद असणार आहेत. ज्या बाजारपेठा अनलॉकच्या कालावधीत सुरू करण्यात आलेल्या होत्या. त्या सर्व बाजारपेठा 10 दिवस बंद असणार आहेत.

या लॉकडाऊनच्या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार असून सोलापूर शहराच्या सर्व सीमा सील करण्यात येणार आहेत. अतिरिक्त पोलिस बंदोबस्त शहरात आणि नाकेबंदीच्या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील लोकांना पासेस देण्यात आलेल्या आहेत. शहरात पास व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश नसणार आहे. महानगरपालिकेतर्फे या दहा दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात येणार आहे.

पालिकेच्यावतीने यासाठी 400 लॉकडाऊन असिस्टंट, 26 लॉकडाऊन निरीक्षक, 26 लॉकडाऊन क्षेत्रीय अधिकारी, 26 ल़ॉकडाऊन पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करताना कोणीही आढलल्यास त्यांच्याविरोधात पोलिसांत फिर्याद देण्याचे आदेश पालिका आयुक्तांच्या वतीने देण्यात आले आहेत. कामगार नेते नरसय्या आडम यांनी शहरात लागू करण्यात आलेल्या या लॉकडाऊनचा विरोध केला होता. त्यामुळे 10 दिवस हा लॉकडाऊन कशा पद्धतीने राबविला जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

लॉकडाऊनच्या काळात सोलापुरातील या सुविधा असणार सुरु

  • दूध विक्रेते यांना घरपोच दुध वितरणासाठी सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत परवानगी.
  • सर्व खासगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा आणि पशुचिकित्सक सेवा त्यांच्या नियमित वेळेनुसार
  • सर्व रुग्णालये व रुग्णालयांशी निगडीत सेवा आस्थापने
  • सर्व मेडिकल दुकाने 24 तास सुरु,औषधांशिवाय इतर विक्रीस परवानगी नाही.
  • अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी शहरात पोलिस विभागातर्फे संचलित केले जाणारे दोन पेट्रोल पंप
  • एलपीजी गॅसचे घरपोच वितरण
  • बँकेच्या सर्व शाखा बंद मात्र एटीएम, काही बँकेचे चेक क्लिअरिंग हाऊसेस सुरु राहणार

लॉकडाऊनच्या कालावधीत सोलापुरातील या सुविधा बंद

  • सर्व किराणा दुकान, सर्व किरकोळ व ठोक विक्रेते, सर्व इतर व्यवसाय करणारे व्यापारी दुकाने, सर्व प्रकारचे उद्योग संपूर्णत: बंद
  • सार्वजनिक/खासगी क्रिडांगणे
  • उपहार गृह, लॉज, हॉटेल्स, रिसार्ट, मॉल, बाजार, मार्केट
  • सर्व केश कर्तनालय, सलुन, स्पा, ब्यूटी पार्लर
  • किरकोळ व ठोक विक्रीचे ठिकाण, आडत बाजार, फळ आणि भाजी मार्केट, आठवडी व दैनिक बाजार, बाजार समिती
  • शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, सर्व प्रकारच्या शिकवणी
  • सार्वजनिक आणि खासगी प्रवासी वाहने, बससेवा
  • मटन, चिकन, अंडी व मासे विक्री