
नवी दिल्ली – जीवघेण्या कोरोना व्हायरसपुढे संपूर्ण जग हतबल झाले असून या संकटातून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी जगभरातील अनेक देश यावरील प्रतिबंधक लस शोधण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्यातच आपल्या देशात आजही कोरोना चाचणीचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर असल्याची बाब लक्षात घेत केंद्र सरकारने आज स्वस्तातील कोरोना टेस्ट किट लाँच केले.
केंद्र सरकारने लाँच केले जगातील सगळ्यात स्वस्त कोरोना टेस्ट किट
सगळयात स्वस्त असे कोरोना टेस्ट किट केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक आणि मनुष्यबळ खात्याचे राज्यमंत्री संजय धोत्रे या दोघांनी मिळून आज लाँच केले. या स्वस्तातील कोरोना टेस्ट किटची निर्मिती दिल्ली आयआयटीने केली आहे.
हे किट बाजारात न्यूटेक मेडिकल कंपनी उपलब्ध करणार असून या किटचे नाव ‘कोरोश्योर’ असे आहे. देशातील कोरोना चाचण्यांच्या पद्धतीमध्ये ‘कोरोश्योर’मुळे मोठा बदल होईल आणि चाचण्यांची संख्या आणि किंमत यामध्ये फरक दिसेल. आयआयटी दिल्लीची टेक्नोलॉजी न्यूटेक मेडिकल कंपनी वापरणार आहे. परवडणाऱ्या दरात महिन्याला २० लाख चाचण्या करणे शक्य असल्याचे आयआयटी दिल्लीचे संचालक व्ही. रामगोपाल राव म्हणाले. आयसीएमआर आणि ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने या किटला परवानगी दिली आहे.
