शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांवर संतापली कंगना


स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआ छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर सोशल मीडियावर निर्माण झालेले वादंग काही केल्या शांत होण्याचे नावच घेत नाही आहे. सध्या सर्वच माध्यमांमध्ये महापुरूषांचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई व्हायलाच हवी, अशा आशयाच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. त्यातच आता बॉलीवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना राणावतने देखील अशीच प्रतिक्रिया दिली आहे.


आपले याबाबत मत व्यक्त करण्यासाठी कंगनाने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ज्यांना दोन पैशांचीही किंमत नाही आहे, ज्यांचा काहीच उपयोग नाही आहे, असे लोक शहीदांची खिल्ली उडवतात ते केवळ लक्ष वेधून घेण्यासाठी. हे योग्य नाही. नॅशनल हिरो आणि थोर व्यक्तींची मस्करी करणाऱ्यांविरोधात कठोर कायदा असणे काळाची गरज असल्याचे ट्विट करत कंगनाने या साऱ्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांबाबत उपहासात्मक वक्तव्य करणाऱ्या अग्रिमा जोशुआवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्यात आली होती. तिला बलात्काराच्या धमक्या देणारा व्हिडीओच शुभम मिश्रा या तरुणाने पोस्ट केला होता. याप्रकरणी अभिनेत्री स्वरा भास्करसह अनेकांनी त्याला अटक करण्याची मागणी केली होती. दरम्यान वडोदरा पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Leave a Comment