मोदी सरकारमुळे भारत आपली ताकद आणि सन्मान गमावत आहे; राहुल गांधींची टीका


नवी दिल्ली – चाबहार ते जाहेदानपर्यंत रेल्वे मार्ग उभारण्याच्या प्रकल्पातून भारताला वगळून इराणने एकप्रकारे भारताला मोठा झटका दिला आहे. यावरुन मोदी सरकारवर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे. भारताच्या जागतिक धोरणाची लक्तरे झाल्याचे म्हणत आपली ताकद आणि सन्मान गमावत असल्याचेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. यासंदर्भात राहुल गांधी यांनी ट्विट केले असून आपल्या ट्विटमध्ये राहुल गांधी म्हणतात, भारताच्या जागतिक धोरणाची लक्तरे झाली असून आपण प्रत्येक ठिकाणी आपली ताकद आणि सन्मान गमावत आहोत. भारत सरकारला काय करायचे याची काहीच कल्पना नाही.


दरम्यान काल भारताकडून निधी मिळण्यात होत असलेल्या विलंबामुळे इराणने चाबहार रेल्वे प्रकल्पातून भारताला वगळले आहे. यासंदर्भातील वृत्त ‘द हिंदू’ने दिले आहे. चार वर्षांपूर्वी चाबहारहून अफगाणिस्तान सीमेवर जाहेदानपर्यंत रेल्वे मार्ग बनवण्यासंदर्भात इराण आणि भारत यांच्यात करार झाला होता. इराणने हा प्रकल्प आता स्वत:च पूर्ण करण्याचा निर्णय घेतला असून यावर कामही सुरु केले आहे.

‘द हिंदू’ने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकल्पासाठी निधी मिळण्यास भारताकडून विलंब होत आहे, परिणामी आम्ही स्वत:च यावर काम करण्यास सुरुवात केल्याचे इराणचे मत आहे. 628 किलोमीटर लांबीचा हा रेल्वे मार्ग बांधण्याचे काम मागील आठवड्यात सुरु झाले आहे. इराणचे वाहतूक शहरी विकास मंत्री मोहम्मद इस्लामी यांनी याचे उद्घाटन केले. हा रेल्वे मार्ग सीमा पार करुन अफगाणिस्तानच्या जारांजपर्यंत जातो. इराणी अधिकाऱ्यांनी सांगितले की, मार्च 2022 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण केला जाईल. यासाठी आता इराणच्या राष्ट्रीय विकास निधीचा वापर केला जाईल.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार वर्षांपूर्वी जेव्हा इराणचा दौरा केला होता. तेव्हा भारत-अफगाणिस्तान आणि इराणमध्ये हा करार झाला होता. तेहरानमध्ये चाबहार रेल्वे मार्गाच्या योजनेबाबत करारावर इराणचे अध्यक्ष रुहाणी, अफगाणिस्तानचे अध्यक्ष घणी आणि आयआरसीओएन यांच्यात स्वाक्षरी केली होती. इराणी रेल्वे मंत्रालयासोबत झालेल्या या रेल्वे मार्गाच्या निर्मितीच्या करारात भारताकडून इंडियन रेल्वेज कन्स्ट्रक्शन लिमिटेडचा (IRCON)सहभाग होता.

Leave a Comment