बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेचा पावनखिंडीतील थरार रुपेरी पडद्यावर, ‘जंगजौहर’चा टीझर रिलीज


‘जंगजौहर’ या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या पराक्रमाचा हा थरार लवकरच रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे. युवा लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर ‘फर्जंद’,’फत्तेशिकस्त’अशा शिवचरित्रावर आधारित यशस्वी चित्रपटांच्या मालिकेतील पुढचे सुवर्णपान आपल्यापुढे उलगडणार आहेत. या भव्य चित्रपटाची निर्मिती अजय आणि अनिरुद्ध आरेकर यांच्या ‘आलमंड्स क्रिएशन्स’ने केली आहे.


आता ३५० हून अधिक वर्षे पावनखिंडीतील या रक्तरंजित संघर्षाला उलटून गेली आहेत. हा शिवकाळ पुन्हा जिवंत करणे अतिशय आव्हानात्मक होते. त्यासाठी आवश्यक भव्य सेट्स, अतिशय अवघड साहसदृश्ये आणि तांत्रिक कौशल्य यांची मोट बांधणे जिकीरीचे होते. दिग्पाल लांजेकर आणि त्यांच्या टीमने नेहमीच्या अभ्यासू वृत्तीने आणि मेहनतीने हे शिवधनुष्य उचलले आहे. आधीच्या चित्रपटांच्या अद्भुत अनुभवामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर यांच्यासह सुमारे २१ कलाकारांची भली मोठी फौज यात दिसणार आहे. लहानपणापासून ऐकलेला पावनखिंडीतील दिव्य पराक्रमाचा इतिहास पडद्यावर अनुभवणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ‘जंगजौहर’ चित्रपटाचे चित्रीकरण संपवून लवकरच प्रदर्शनासाठी सज्ज होत आहे. त्याआधी आज या चित्रपटाची पहिली झलक पोस्टर आणि टीझर रुपात आपल्याला पहायला मिळत आहे.

Leave a Comment