ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठात कोरोना प्रतिबंधक लसीची ह्युमन ट्रायल


क्वीन्सलँड : कोरोना व्हायरस प्रतिबंधक लसींच्या ह्युमन ट्रायलला ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठात सुरुवात झाली असून 120 स्वयंसेवकांनी या चाचण्यांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आहे. याबाबतची माहिती प्रसार माध्यमांना ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड प्रांताच्या पंतप्रधान Annastacia Palaszczuk यांनी दिली.

क्वीन्सलँड विद्यापीठातील मानवी चाचण्यांचे निष्कर्ष सकारात्मक आले तर कोरोनापासून जगाचे संरक्षण होईलच शिवाय क्वीन्सलँडच्या अर्थव्यवस्थेला उभारी येईल, असे Palaszczuk यांनी सांगितले. क्वीन्सलँड विद्यापीठाने बनवलेल्या लसीचे प्राण्यांवरील चाचण्यांचे निष्कर्ष खूपच सकारात्मक आल्यामुळे संशोधकाचे मनोबल वाढले आहे. क्वीन्सलँड विद्यापीठाच्या लसीच्या प्राण्यांवरील चाचण्या नेदरलँडमध्ये झाल्या आहेत.


कोरोना लसीबाबतच्या संशोधनासाठी विद्यापीठाची प्रशंसा करतानाच, त्यांच्या चाचणीचा आज पहिलाच दिवस असल्याने आत्ताच त्याच्या निष्कर्षांवर बोलणे घाईचे होईल, असेही क्वीन्सलँडच्या पंतप्रधान Annastacia Palaszczuk म्हणाल्या. क्वीन्सलँडने मार्च महिन्यापासून कोरोना प्रतिबंधक लसीच्या संशोधनासाठी सुरुवात केल्याचेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
क्वीन्सलँड सरकारने या संशोधनासाठी विद्यापीठाला एक कोटी डॉलर्सचा निधी दिला आहे. क्वीन्सलँड विद्यापीठातील कोरोना लसीच्या मानवी चाचण्या आणि प्रत्यक्षात लस तयार होण्यासाठी सहा महिन्यांचा अवधी अपेक्षित असल्याचेही पंतप्रधान Annastacia Palaszczuk यांनी सांगितले.


दर चार आठवड्यांनी या मानवी चाचण्यात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांना या लसीचे दोन डोस इंजेक्शनच्या माध्यमातून दिले जातील. या चाचणीत सहभागी झालेले स्वयंसेवक तब्बल 12 महिने निरीक्षणाखाली असतील. या लसीमुळे तयार होणारी रोगप्रतिकारक क्षमतेची सातत्याने चाचपणी केली जाणार आहे. या चाचणीचे पहिले निष्कर्ष येण्यासाठी सप्टेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.


क्वीन्सलँड विद्यापीठातील कोरोना प्रतिबंधक लसीच्या संशोधकांच्या टीमचे प्रमुख Dr. Paul Young यांनी सांगितले की ही लस लोकांच्या वापरासाठी प्रत्यक्ष कधीपर्यंत तयार होईल, हे आताच सांगणे अवघड असले तरी किमान वर्षभर तरी वाट पाहावी लागणार आहे.

Leave a Comment