मनसेच्या महिला फायरब्रँड नेत्याकडून केतकी चितळेची कानउघडणी


पुणे: स्टँड-अप कॉमेडियन अग्रिमा जोशुआने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यभरात तिच्या विरोधात संतापाची लाट उसळल्यानंतर अग्रिमा जोशुआ काम करत असलेल्या स्टुडिओची मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. पण याचदरम्यान, मराठी अभिनेत्री केतकी चितळेच्या एका नव्या पोस्टमुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

शिवाजी, फक्त एवढे ऐकले की आम्ही उगाच पेटून उठणार. मजकूर आम्हाला तसाही कधी कळतच नाही, कारण तेवढी आमची बुद्धीमत्ता मुळातच नाही. मग ३ वर्षाच्या मुलाची बौद्धिक पातळी असलेले स्वघोषित मावळे, शिवाजी हा एक शब्द ओळखतात आणि महाराजांच्या शिकवणीला फाट्यावर मारून, महाराजांच्या नावावर राजकारण करायचा पोकळ विनोद सुरू करतात. बरं, अशा वागण्यानी आपण आपली लायकी दाखवून देतोय हे त्यांच्या लक्षात येत नाहीच. अर्थात हे कळण्यासाठीही नखाएवढी अक्कल लागतेच म्हणा!

सोशल मिडीयावर ‘मराठी’ असा शब्द टाकून वाटेल तसा वणवा, काही लाईक्ससाठी पेटवणारे २० ते २५ वयोगटातील पोरे, ज्यांना खऱ्या आयुष्यात कुणी भाव अथवा नोकरी ही देणार नाही अशी कार्टी, या सर्कस चे रिंग मास्टर असतात. अरे मूर्खांनो, शालेय शिक्षण तरी घ्या! पण ते तरी कसे घेणार, कारण आमचे प्रेरणास्थान तर आर्ची (नाव ही मराठी नाही) आणि पर्शा! आम्ही फक्त भांडण करण्यासाठी महाराज, बाबासाहेब, फुले यांची नावे घेणार, त्यांनी लिहिलेल्या साहित्याचा अभ्यास कोण करणार!! सुधारणा करा बाळांनो, शिका., असे केतकीने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. केतकीच्या या पोस्टनंतर तिला नेटकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले आहे. आता त्यातच मनसेच्या महिला फायरब्रँड नेत्याने देखील केतकीची कानउघडणी केली आहे.

फेसबुक पोस्टद्वारे मनसे नेत्या रुपाली पाटील यांनी केतकी चितळेवर निशाणा साधला आहे. रुपाली पाटील म्हणाल्या की, केतकी यावेळी तू चुकलीस. तुला मागे ट्रोल केले म्हणून आम्ही महिलेला असे ट्रोल करू नये, असे नेटकऱ्यांना सुनावले होते. नावडती केतकी दरवेळेला वादग्रस्त वक्तव्य करुन लोकांना त्रास देण्याचे काम करते आहे.

Leave a Comment