महाराष्ट्रात पतंजलीच्या कोरोनिल विक्रीला परवानगी नाही


मुंबई – पतंजलीच्या कोरोनिलला राजस्थान सरकारपाठोपाठ महाराष्ट्रातही झटका लागला आहे. महाराष्ट्रात पतंजलीच्या कोरोनिल विक्रीवर बंदी घालण्यात आल्या संदर्भातील माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. पतंजलीच्या कोरोनिलची जयपूरच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सने क्लिनिकल ट्रायल घेतली का याची माहिती घेण्यात येईल असे सांगतानाच देशमुख यांनी महाराष्ट्रात नकली औषधांना विकण्यास परवानगी मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

जगभरातील शास्त्रज्ञ युद्धपातळीवर कोरोनावर औषध शोधण्यासाठी प्रयत्न करत असताना बाबा रामदेव यांनी आपण कोरोना प्रतिबंधक औषध शोधल्याचा दावा केला होता. हे औषध पंतजली योगपीठाने तयार केले असून ते मंगळवारी लाँच करण्यात आले. पण, बाजारात आणण्याआधीच केंद्र सरकारने या औषधाच्या विक्रीवर बंदी घातली होती. त्याचबरोबर बाबा रामदेव यांच्या पतंजलीने आयुर्वेद विभागाकडून केवळ ताप, खोकला व रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या औषधाचीच परवानगी घेतली होती, अशी धक्कादायक माहिती उत्तराखंड आयुर्वेद विभागाने दिली होती.


सगळ्यांसमोर हे औषध आल्यानंतर काही तासांतच केंद्रीय आयुष मंत्रालयाने त्याच्या जाहिराती बंद करण्याचे आदेश जारी केले होते. केंद्र सरकारने या औषधाची चाचणी होईपर्यंत जाहिरात थांबवण्यात यावी, असे सांगत पतंजलीला कोरोनावरील औषधाची जाहिरात थांबवण्याचे आदेश दिले होते.

या औषधाची सध्या केंद्र सरकार चाचणी करत असतानाच पतंजलीला आणखी एक धक्का बसला होता. पतंजलीने दिलेल्या अर्जानुसार त्यांना परवानगी देण्यात आली. पण, त्यांनी परवानगीसाठी केलेल्या अर्जात कुठेही कोरोनाचा उल्लेख केलेला नव्हता. केवळ रोग प्रतिकारक शक्ती, खोकला व ताप यावर औषध बनवण्याचीच परवानगी विभागाने दिली होती. कोरोनावर औषध तयार करण्याची परवानगी कशी मिळाली, याबद्दल पतंजलीला नोटीस पाठवून उत्तर मागणार असल्याचे परवाना अधिकाऱ्यांने सांगितल्यानंतर आता महाराष्ट्रातही या औषधाच्या विक्रीला परवानगी मिळणार नसल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Comment