नेपोटिझम; सलमान खानवर जिया खानच्या आईचे गंभीर आरोप


अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये नेपोटिझमवर सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. त्यातच बॉलीवूडचा भाईजान अर्थात सलमान खान याच्यावर दबंगच्या पहिल्या भागाचा दिग्दर्शक अभिनव कश्यपसह अनेक चाहत्यांनी आरोप केल्यानंतर आता सलमान खानवर अभिनेत्री जिया खानच्या आईने देखील गंभीर आरोप केले आहेत. 2013 मध्ये अभिनेत्री जिया खानने आत्महत्या केली होती. आता जियाची आई राबिया अमीन यांनी सुशांतच्या आत्महत्येनंतर इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत सलमान खानवर आरोप केले आहेत.

राबिया यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडीओत, सुशांत सिंहच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. अशी घटना हृदय पिळवटून टाकणारी असते. ही काही मस्करीची गोष्ट नाही. पण बॉलिवूडला आता बदलावे लागेल आणि जागे व्हावे लागेल. एखाद्याची खिल्ली उडवणे पूर्णपणे बंद करावे. कारण खिल्ली उडवणे हे एक प्रकारे हत्या करण्यासारखेच असल्याचे म्हटले आहे.


त्याचबरोबर राबिया यांनी, बॉलीवूडमध्ये जे काही घडत आहे, त्याने मला 2015 ची आठवण करून दिली. सीबीआय अधिकाऱ्यांना जियाच्या आत्महत्येनंतर काही पुरावे मिळाले होते. यासंबंधी त्यांनी मला लंडनहून भारतात भेटायला बोलावले होते. त्यांना मी भेटले तेव्हा ते म्हणाले की, सलमान खानचा फोन आला होता. तो दररोज फोन करतो आणि पैशांबद्दल बोलतो. तो अधिकाऱ्यांना सांगतो की मुलाला काही विचारू नका, त्याला हात लावू नका, त्याची चौकशी करू नका. मग आम्ही काय करू शकतो, असे म्हटले आहे.

तो अधिकारीही या सर्व गोष्टींमुळे त्रासलेला आणि नाराज दिसत होता. मग ही गोष्ट मी दिल्लीतील उच्चाधिकाऱ्यांपर्यंत नेली. याबद्दल मी तक्रारही केली. मी सर्वांना सांगू इच्छिते की, या विरोधात उभे रहा, आंदोलन करा, लढा आणि बॉलिवूडमधील या वागणूकीला वेळीच थांबवा, असे देखील राबिया यांनी म्हटले आहे.

Leave a Comment