अजय देवगणने शेअर केला ‘लाल बाजार’चा ट्रेलर


कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यामुळे देशभरातील सर्वच उद्योगधंदे बंद झाले. त्याला बॉलीवूड देखील अपवाद ठरले नाही. लॉकडाऊनमुळे सिनेउद्योग पार ठप्प पडला आहे. कोणताही चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित करण्यावर सध्या निर्बंध आहेत. परिणामी आता ओटीटी प्लॅटफॉर्मचा मार्ग अनेक चित्रपटांनी स्विकारला आहे. आता आणखी एका नव्या चित्रपटाचे नाव या यादीत जोडले गेले आहे. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ‘लाल बाजार’ हा चित्रपट येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच अभिनेता अजय देवगणने शेअर केला. विशेष म्हणजे हा ट्रेलर अवघ्या काही तासांमध्ये सहा लाखांपेक्षा अधिक वेळा पाहिला गेला आहे.

‘लाल बाजार’ हा एक क्राईम, थ्रिलर चित्रपट असून चित्रपटाची कथा कोलकात्तामधील शरीर विक्री करणाऱ्या महिलांच्या खूनाच्या सत्रापासून सुरु होते. ज्या ठिकाणी खून होतात त्या भागाला लोक लाल बाजार म्हणून ओळखतात. आता हे खून कोण आणि कशासाठी करत आहे? या खूनांमध्ये कोणा सिरिअल किलरचा हात आहे का? या प्रश्नांची उत्तर आपल्याला चित्रपट पाहिल्यावरच मिळणार आहेत.


या चित्रपटाची अजय देवगणने प्रचंड स्तुती केली असून लाल बाजारमधील पोलीस बिनधास्त आणि कोणालाही न घाबरणाऱ्या गुन्हेगारांना वठणीवर आणतील, अशी कॉमेंट त्याने या चित्रपटाच्या ट्रेलरसोबत केली आहे. येत्या १९ जूनला झी 5 वर लाल बाजार चित्रपट रिलीज होणार आहे.

Leave a Comment