जगभरातील कोरोना बाधितांचा आकडा 72 लाखांवर


मुंबई – संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने होत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. कोरोना व्हायरसचा जगभरातील 213 देशांमध्ये कहर सुरु असून जगभरात मागील 24 तासांमध्ये 1 लाख 7 हजार नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. तर 3157 ने कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. या संदर्भात वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात आतापर्यंत जवळपास 71.89 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 8 हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 35 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगभरातील जवळपास 60 टक्के कोरोना बाधित रुग्ण फक्त 7 देशांमध्ये आहेत. या देशांमध्ये मिळून कोरोनाग्रस्तांची संख्या 43 लाख आहे.

अमेरिकेमध्ये कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. 20 लाख लोक आतापर्यंत अमेरिकेमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे अमेरिकेत आतापर्यंत एक लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. परंतु, सध्या अमेरिकेपेक्षा ब्राझीलमध्ये नवे रुग्ण आणि मृतांचा आकडा झपाट्याने वाढताना दिसत आहे. ब्राझीलमध्ये मागील 24 तासांमध्ये 18,925 नवे रुग्ण समोर आले आणि 813 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर अमेरिकेमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 19037 नवे रुग्ण आढळून आले आणि 586 लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. ब्राझीलनंतर रुस आणि भारतात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

कोरोना बाधितांची संख्या ब्राझील, रूस, स्पेन, यूके, इटली, भारत या देशांमध्ये दोन लाखांच्या पार पोहोचली आहे. याव्यतिरिक्त नऊ देश असे आहेत, जिथे एक लाखांहून अधिक कोरोना बाधित रुग्ण आहेत. सहा देश (अमेरिका, स्पेन, इटली, फ्रान्स, ब्रिटन, ब्राझील) असे आहेत, जिथे 25 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेमध्ये मृतांचा आकडा 1.13 लाखांच्या पार पोहोचला आहे. तर विशेष म्हणजे जिथे कोरोनाचा उगम झाला तो चीन कोरोना बाधित देशांच्या यादीतून बाहेर पडला असून भारताचा टॉप-6 देशांमध्ये समावेश झाला आहे.

Leave a Comment