बोरिवली स्टेशनवर सापडला बेपत्ता झालेल्या कोरोनाग्रस्त वयोवृद्धाचा मृतदेह !


मुंबई : मुंबईतील बोरिवली स्टेशनवर शताब्दी रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या 80 वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीचा मृतदेह सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर कोरोना पॉझिटिव्ह असल्याने शताब्दी रुग्णालयात उपचार सुरु होते. काल पहाटेपासून ही व्यक्ती बेपत्ता होती. बोरिवली स्टेशनवर आज त्यांचा मृतदेह आढळला. दरम्यान या वयोवृद्ध व्यक्तीचा जीव रुग्णालयाच्या निष्काळीपणामुळे गेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

मुंबईतील मालाड परिसरात 80 वर्षीय ही व्यक्ती होती. तीन दिवसांपूर्वी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांना दाखल करण्यात आले होते. या व्यक्तीचे नातेवाईक सोमवारी पहाटेपासून संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते पण संपर्क होऊ शकला नाही. अखेर शेजारच्या बेडवर अॅडमिट असलेल्या एका रुग्णाने फोन उचलला आणि रुग्ण सकाळपासून बेडवर नसल्याचे सांगितले. पहाटे साडे पाच वाजल्यापासून रुग्ण बेडवर नाही. तसेच रुग्णालयालाही कळवले असल्याचे त्या रुग्णाने सांगितले, पण तरीही पुढचे काही तास रुग्णालयाने ही घटना गांभीर्याने घेतली नाही. पहाटे रुग्ण बेपत्ता झाल्याने, सकाळच्या शिफ्टला येणारे कर्मचारी वेगळे असतात. त्यामुळे सकाळपासून नातेवाईकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

शताब्दी रुग्णालयाकडून याआधीही अनेकदा हलगर्जीपणा झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे या सर्व प्रकारावरुन मुंबईच्या रुग्णालयांमध्ये सध्या काय चालले आहे ? हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. शताब्दी रुग्णालयाच्या भोंगळ कारभारामुळे 80 वर्षीय आजोबा बेपत्ता झाले आणि आज त्यांचा मृतदेह आढळला. त्यामुळे या आजोबांच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा प्रश्नही विचारला जात आहे.

दरम्यान रुग्णालयातून कोरोना पॉझिटिव्ह आजोबा बेपत्ता झाल्यानंतर त्यांना धीर देण्याचे काम करण्याऐवजी रुग्णालयाने त्यांच्या कुटुंबीयांनी उडवाउडवीची दिली होती. तुमचा रुग्ण पळून गेला आहे, असे सांगत रुग्णालयाने हात वर केले होते. रुग्णालयाच्या या उत्तरामुळे नातेवाईक प्रचंड संतापले. 80 वर्षीय व्यक्ती पळूच कशी शकते? जर पळून गेले असतील तर सुरक्षा व्यवस्था कुठे होती? आजोबांच्या जीवाचे बरे वाईट झाले तर त्याला जबाबदार कोण? असे सवाल नातेवाईकांनी उपस्थित केले होते. तसेच पहाटेपासून रुग्ण बेपत्ता असूनही सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची तसदी रुग्णालयाने घेतली नाही. थोड्या वेळाने या, आता आयटीचे कर्मचारी नाहीत, अशी उत्तरे रुग्णालयाकडून देण्यात आली. यासंदर्भातील वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे.

80 वर्षीय रुग्ण कांदिवलीमधील शताब्दी रुग्णालयातून बेपत्ता झाल्यानंतर त्याचा शोध घेतला जाईल असे आश्वासन महापालिकेने दिले होते. याची महापालिका प्रशासनाने गंभीर नोंद घेतली असून याबाबत जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश रुग्णालय प्रशासनाला दिले आहेत. रुग्णालयाने याबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात कळवले असून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने गायब रुग्णाचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली होती. परंतु आज त्यांचा मृतदेहच सापडला आहे.

Leave a Comment