कोरोना उपचारादरम्यान मुंबई महापालिकेच्या उपायुक्तांचा मृत्यू


मुंबई – कोरोनाची लागण झाल्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या विशेष प्रकल्पाचे प्रभारी उपायुक्त शिरीष दीक्षित यांचे निधन झाले. शिरीष दीक्षित यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण दीक्षित यांनी मंगळवारी अखेरचा श्वास घेतला. महापालिकेच्या विशेष पाणीपुरवठा प्रकल्प विभागाचे शिरीष दीक्षित मुख्य अभियंता होते.

दरम्यान कोरोना व्हायरसच्या साथीच्या काळात कार्यरत असणाऱ्या मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. या साथकाळात कार्यरत असताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या वारसांना 50 लाख रुपये सानुग्रह अनुदान साहाय्य येणार आहेत. फक्त आरोग्य सेवेतच नाही तर पालिकेच्या सर्वच कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी ही विमा योजना लागू करण्यात आली आहे. फक्त कायमच नव्हे तर कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही ही मदत देण्यात येईल. नियमित कामगार/कर्मचारी यांच्यासह कंत्राटी, बाह्य स्त्रोतांद्वारे घेतलेले, मानसेवी, रोजंदारी, तदर्थ तत्त्वावरील कर्मचाऱ्यांनाही मृत्यू झाला तर असे सहाय्य मिळणार आहे.

हा विमा कोरोनाच्या साथीदरम्यान सेवा देणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला लागू होईल. ही योजना दिनांक 1 मार्च ते 30 सप्टेंबर 2020 कालावधीसाठी लागू करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांचा 50 लाखांचा अशा पद्धतीने विमा उतरवणारी ही देशातील पहिलीच महापालिका असल्याचा दावा मुंबई महापालिकेचा आहे.

Leave a Comment