भारतीय आरोग्य सेतूवर पाकड्यांचा डोळा; पाठवली जात आहे बनावट लिंक


मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने आरोग्य सेतू हे अॅप लाँच केले होते. या अॅपच्या माध्यमातून कोणत्या क्षेत्रात कोरोनाचा रुग्ण आहे याची तात्काळ माहिती नागरिकांना मिळत आहे. देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अॅपचा आवर्जुन उल्लेख केला होता. त्याचबरोबर हे अॅप वापरण्याबाबत सरकारकडून आग्रह देखील केला जात आहे. पण आता पाकिस्तानी हॅकर्स याच ॲपचे बनावट ॲप तयार करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर येत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वीच आरोग्य सेतू ॲपची निर्मिती केली होती. या अॅपच्या माध्यमातून आपल्या आजूबाजूला कोणी कोरोनाबाधित आहे का याची माहिती मिळते. अनेक लोकांनी केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटवरून आपल्या मोबाईलमध्ये हे अॅप डाउनलोड केले आहे.

पण सध्याच्या घडीला भारत सरकारचे आरोग्य सेतू ॲप हे पाकिस्तानी हॅकरच्या डोळ्यात खूपु लागले आहे. अगदी हुबेहूब आरोग्य सेतू सारखे तयार करून ते भारतीयांच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करण्यासाठीचे प्रयत्न देखील व्हाट्सअॅपच्या माध्यमातून केले जात असल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. आरोग्य सेतू ॲपची व्हाट्सअॅप लिंक तुमच्याही मोबाइलवरही आली तर ती लिंक तात्काळ डिलिट करा, ओपन करू नका. आपण जर ही ओपन केली तर आपल्या मोबाईलचा संपूर्ण ताबा हा पाकिस्तानी हॅकर्स घेतील, असा सायबर पोलिसांचा दावा आहे.

आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड लिंकशी छेडछाड करीत पाकिस्तानी हॅकर्सकडून बनावट आरोग्य सेतू ॲप तयार करून त्याची लिंक अनेकांच्या व्हाट्सअॅपवर पाठवली आहे. अशा बनावट व खोट्या लिंक अनेकांकडून एकमेकांना पाठवल्या जात आहेत. या बनावट लिंकद्वारे नागरिकांचा आणि भारतीय लष्कराचा संवेदनशील डाटा चोरीला जाण्याची शक्यता आहे. ही बाब पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अशा लिंकद्वारे ॲप डाऊनलोड करू नये, असे आवाहन नागरिकांना केले आहे. तसेच ज्यांना आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करायचे आहे, त्यांनी केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर अथवा गुगल प्ले स्टोअरवर जाऊन अधिकृत अॅप डाऊनलोड करावे, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

हे बनावट ॲप ओळखणे एकदम सोपे आहे. या बनावट ॲपचे फाईल एक्सटेंशन डॉट एपीके (.apk) म्हणजे अँड्रॉइड ॲप्लिकेशन किट आणि ओरिजनल आरोग्य सेतू आपचे फाईल एक्सटेंशन डॉट ओआरजी डॉट इन(.org. in)असे असल्यामुळे ॲप डाऊनलोड करताना ही काळजी घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर सेलचे आयजी यशस्वी यादव यांनी म्हटले आहे.

जर तुमच्या फोनवरुन बनावट अॅप डाऊनलोड झाले असेल तर तुमचा फोन हॅकरच्या ताब्यात जाऊ शकतो. त्याचबरोबर ते तुमचे व्हाट्सअॅपही चॅटही वाचू शकतात. व्हाट्सअॅपही कॉल ऐकू शकतात. तुमच्या सगळ्या इमेजेस पाहू शकतील.

सध्या हे सायबर क्राईम समोरचे मोठे आव्हान आहे. कारण याचे सर्व्हर हे नेदरलँडमध्ये असल्यामुळे ट्रॅक करणे हे मल्टिनॅशनल चॅलेंजिंग टास्क आहे. हे ॲप सैन्यदलातील अधिकाऱ्यांच्या मोबाईलमध्ये पोहोचले जाईल, यासाठी पाकिस्तानी हॅकर्सकडून खास प्रयत्न केले जात असल्याचे देखील सायबर सेलचे आयजी यशस्वी यादव यांनी सांगितल्यामुळे आपल्यालाही अशी एखादी व्हाट्सअॅप वर आरोग्य सेतूची लिंक आली, तर ती तात्काळ डिलीट करून सायबर सेलला तक्रार करा, असे त्यांनी सांगितले आहे.

Leave a Comment