एका फोटोग्राफरमुळे अख्ख गावच झाले कोरोनाबाधित


नवी दिल्ली : देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत सातत्याने खूप मोठी वाढ होत आहे. त्यात दिलासादायक बाब म्हणेज अशी की देशातील मृत्यूदर हा इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. पण असे असले तरी देशातील काही शहरांमध्ये कम्युनिटी स्प्रेड होण्याचा धोका जास्त वाढला आहे. त्यातच आता एका फोटोग्राफरमुळे आंध्र प्रदेशातील काकीनाडा हे शहर हादरले आहे.

कोरोना हॉटस्पॉट म्हणून काकीनाडापासून 20 किमीवर असलेले गोल्लाला ममीददा हे गाव ओळखले जात आहे. कोरोनाचे तब्बल 116 रुग्ण या एकट्या गावात आहेत. पण या सगळ्या मागे एक फोटोग्राफर कारण ठरला. 20 मे रोजी या गावातील 53 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला, ही व्यक्ती फोटोग्राफर असून गावातील विविध कार्यक्रमादरम्यान उपस्थित होती. कोरोनाचा प्रसार या व्यक्तीमुळेच झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

पेडापुडी मंडल, रामचंद्रपूरम,अनापर्ती, बिक्कावोलू आणि मंदेपेटा मंडल या गावात ही मृत व्यक्ती कार्यक्रमांसाठी गेली होती. त्यानंतर या गावात तब्बल 150 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. या व्यक्तीला कोरोनाची रामचंद्रपूरममध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमात फोटो काढत असताना लागण झाली, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

विशेष म्हणजे या कार्यक्रमाला ही व्यक्ती मास्कशिवाय उपस्थित होती. या फोटोग्राफर व्यक्तीचा मुलगाही कोरोनाबाधित झाल्याचे आढळून आले होते. या मुलानेही याच दरम्यान काही मित्रांसोबत पार्टी केली होती. त्यामुळे ही व्यक्ती कोरोना सुपर स्प्रेडर म्हणून ओळखली जात आहे. दरम्यान, पूर्व गोदावरी जिल्ह्यात सध्या कोरोनाचे 300 रुग्ण आहेत. तर आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाचे एकूण 4,510 रुग्ण आहेत. यातील 2,620 रुग्ण निरोगी होऊन घरी परतले आहेत तर, 73 जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment