कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढाईत अँटीबॉडी टेस्ट वरदान ठरू शकले असते, मात्र असे झाले नाही. जागतिक आरोग्य संघटनेने एप्रिलमध्येच स्पष्ट केले होते की अँटीबॉडी टेस्टवर निर्भर राहिल्याने व्हायरसचा प्रसार होण्याचा धोका वाढेल. अमेरिकन मेडिकल असोसिएशनने देखील अँटीबॉडी टेस्टचा वापर व्यक्तीची इम्युनिटी तपासण्यासाठी करू नये, असे सांगितले होते. अमेरिकेच्या सीडीसीने देखील या टेस्टवर विश्वास ठेऊन लोकांना बाहेर जाण्याची परवानगी देऊ नये असे म्हटले होते.
कोरोना : अँटीबॉडी टेस्ट विश्वासदायक नाहीत ?
अधिकांश अँटीबॉडी टेस्टचे रिझल्ट चुकीचे येत आहेत. व्यक्तीच्या आत व्हायरसविरोधात लढण्यासाठी अँटीबॉडी विकसित झाल्याचे समजल्यास व्यक्ती बिंधास होऊन आधी प्रमाणेच बाहेर फिरेल. मात्र जर हा रिझल्ट चुकीचा असल्यास संसर्गाचा धोका वाढेल. उच्च दर्जाचे किट असले तरी याचे परिणाम चुकीचे येत आहेत. अँटीबॉडी टेस्टचे रिझल्ट चुकीचे येण्यामागे खराब क्वॉलिटी आणि चुकीची वेळ ही कारणे आहेत.

भारताने एप्रिल महिन्यात अचानक अँटीबॉडी टेस्टवर बंदी घातली होती. कोरोनाग्रस्त रुग्णांचे देखील रॅपिड टेस्टमध्ये रिझल्ट नेगेटिव्ह येत होते. याचे मोठे कारण खराब दर्जाची किट हे होते. अनेक देशांमध्ये अँटीबॉडी टेस्टच्या विश्वसनियतेवर प्रश्न उपस्थित झाले. उच्च दर्जाच्या किट्ससोबत देखील हीच समस्या होती. अमेरिका, स्पेनमध्ये उच्च दर्जाचे किट्स असताना देखील रिझल्ट चुकीचे येत होते.

उच्च दर्जाचे किट असतानाही रिझल्ट चुकीचे येण्यामागे वेळ देखील कारणीभूत आहे. मॅकगिल यूनिव्हर्सिटीने संसर्गाच्या प्रमाणात टेस्ट किटच्या रिझल्टच्या विश्वसनीयतेचा ग्राफ तयार केला आहे. समजा, उच्च दर्जाच्या किटचा वापर होत आहे. 1 टक्क लोकसंख्या संसर्गग्रस्त असल्यास टेस्टचे परिणाम 47.2 टक्के योग्य येतील. मात्र 5 टक्के लोकसंख्या संक्रमित झाल्यास टेस्टची विश्वसनीयता 82.3 टक्के होते. 25 टक्के लोकसंख्या संक्रमित झाल्यास विश्वसनीयता 96.7 टक्के होते. अर्धी लोकसंख्या संसर्गग्रस्त झाल्यास अँटीबॉडी टेस्टचे परिणाम 98.9 टक्के अचूक येतील.