‘ट्रिपल एक्स’ या सिरीजमुळे ट्रोल झालेल्या एकताने सौडले मौन


डेली सोपची क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकता कपूरने सध्या तिचा मोर्चा डिजिटल प्लॅटफॉर्मकडे वळविला असून त्यादृष्टिने ‘अल्ट बालाजी’ हे नवीन वेबसीरिज अॅप एकताने सुरु केले आहे. पण यातील ‘ट्रिपल एक्स’ या सीरिजमुळे एकताला काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल व्हावे लागले. भारतीय जवानांचा या अॅपवर प्रदर्शित झालेल्या सीरिजमध्ये अपमान केल्याचे हिंदुस्तानी भाऊ या युट्युबरने म्हटल्यानंतर एकताला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. पण आता या प्रकरणी एकताने मौन सोडत आपले मत व्यक्त केले आहे.

एकताने अलिकडेच एक मुलाखती दरम्यान तिच्यावर करण्यात आलेले आरोप, सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगवर आपले मत मांडले आहे. त्याचबरोबर तिने भारतीय जवानांचा अपमान केल्याचा आरोप करण्याविषयीदेखील स्पष्टीकरण दिले आहे. सध्या सोशल मीडियावर तिच्या या मुलाखतीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.


आम्ही देखील या देशाचे नागरिक असून या समाजाचा एक भाग आहोत. त्यामुळे आमच्या मनात भारतीय लष्कराविषयी कायमच आदर आहे आणि तो असेलच यात काही शंका नाही. भारतीय लष्कर आपल्या देशासाठी आणि देशातील जनतेच्या सुरक्षेसाठी कायमच सज्ज आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी आमच्या मनात आदर आहेच. पण या सीरिजमध्ये दाखविण्यात आलेल्या काही दृश्यांमुळे मला ट्रोल केले जात आहे, धमक्या दिल्या जात आहेत. पण ती दृष्य आम्ही कधीच हटविली आहेत. तसेच आम्ही योग्य ती पावलेही या प्रकरणी उचलली आहेत. पण काही जण आम्हाला तरीदेखील धमकी देत आहेत, हे अत्यंत चुकीचे असल्याचे एकता म्हणाली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ‘ट्रिपल एक्स’ ही वेबसीरिज एकताने सुरु केलेल्या ‘अल्ट बालाजी’ या वेबसीरिज अॅपवर रिलीज झाली होती. एका भारतीय जवानाची कथा या सीरिजच्या दुसऱ्या पर्वात दाखवण्यात आली आहे. यामध्ये जवान सीमेवर असताना त्याची पत्नी इतर पुरुषांसोबत अनैतिक संबंध प्रस्थापित करताना दाखवण्यात आल्यामुळे समाजात या कथेमुळे भारतीय जवान आणि त्यांच्या कुटुंबियांविषयी चुकीची माहिती पसरत असल्याचा आरोप प्रसिद्ध युट्युबर हिंदुस्तानी भाऊने केली होती. तसेच त्याने एकता विरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे.

Leave a Comment