जी 7 मध्ये सहभागी होण्यावरुन भारताला चीनची धमकी


नवी दिल्ली – चीन सरकारचे मुखपत्र असणाऱ्या ‘ग्लोबल टाइम्स’मधील लेखामधून आघाडीच्या अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांची संघटना असलेल्या जी सेव्हनमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करणारा भारत आगीशी खेळत असल्याचा धमकी वजा इशारा देण्यात आला आहे. चीनने भारताला जी सेव्हन विस्तारामध्ये सहभागी होत भारत आगीशी खेळ आहे, अशा मथळ्याखाली छापण्यात आलेल्या या लेखामधून या संमेलनामध्ये सहभागी करुन घेण्यामागे अमेरिकेचा वेगळाच हेतू असल्याचे म्हटले आहे. अमेरिका या परिषदेत भारताचा समावेश करुन घेत हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागरामधील आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असून याद्वारे चीनची कोंडी करण्याचा हा डाव असल्याचे म्हटले आहे.

२ जून रोजी रात्री फोनवरुन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये चर्चा झाली. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या जी सेव्हन देशांच्या परिषदेला उपस्थित राहण्याचे ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींनी औपचारिक निमंत्रण दिले. जी सेव्हन देशांच्या संघटनेचा विस्तार करायचा मानस डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला असून ट्रम्प यांनी त्या दृष्टीने भारताला निमंत्रित करण्याचे हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. या निमंत्रणावर भारतानेही सकारात्मक प्रतिसाद दिला असून चीनने याचाच संदर्भ देत भारताला धमकी दिली आहे.

भूप्रदेशासंदर्भातील राजकारणावर आधारित जी सेव्हनचा विस्तार करण्याचा विचार आहे. त्याचबरोबर चीनला कोंडीत पकडण्याचा या विस्ताराचे मूळ हेतू आहे. भारत हा जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असल्याने या परिषदेमध्ये भारताला सामावून घेतले जात नसून अमेरिका भारताला आपल्या हिंदी महासागरातील योजनांचा महत्वाचा जोडीदार समजत आहे. अमेरिका या क्षेत्रामध्ये चीनच्या वाढत्या ताकदीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारताला मजबूत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे ग्लोबल टाइम्समधील लेखात म्हटले आहे. हा लेख ‘ग्लोबल टाईम्स’चे पत्रकार यू जिनकुई यांनी लियू झोंगी यांच्या मुलाखतीवर आधारित लिहिण्यात आला आहे. झोंगी हे शांघाय इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल स्टडीजमधील चीन-दक्षिण आशिया सहकार्याच्या संशोधन केंद्राचे सरचिटणीस असल्यामुळे या लेखामधून चीन भारत आणि अमेरिकेमधील वाढत्या संबंधांकडे कशाप्रकारे पाहत आहे याचा अंदाज बांधता येतो. हा लेख पाच जून रोजी प्रकाशित झाला आहे.

Leave a Comment