राज्यातील ५५ वर्षांपुढील १२ हजार पोलिसांना भरपगारी सुट्टी


पुणे – मागील तीन महिन्यांपासून पोलीस अधिकारी व कर्मचारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अहोरात्र आपली सुरक्षा करत आहेत. या दरम्यान, मोठ्या प्रमाणावर पोलिसांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ५० वर्षावरील २३ हजार पोलिसांना स्टेशनमध्ये काम, तर ५५ वर्षावरील १२ हजार पोलीस कर्मचाऱ्यांना घरीच राहण्याची परवानगी देण्यात आली असून त्यांचा पगारही या काळात सुरु राहणार असल्याची माहिती आज पुण्यात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.


पुण्यातील ताडीवाला रस्ता येथील कंटेन्मेंट झोन आणि येरवडा भागातील अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन येथील कोविड सेंटरला गृहमंत्री देशमुख यांनी भेट दिली. त्यांनी त्या परिसरातील यावेळी माहिती जाणून घेतली. तर पोलीस कर्मचारी आणि अधिकारी वर्गाशी संवाद साधला. देशमुख यावेळी म्हणाले, राज्यातील अनेक पोलिसांचे कोरोनामुळे बळी गेले आहेत. राज्य सरकार मृत पोलिसांच्या कुटुंबातील सदस्यांना ६० ते ६५ लाख रूपयांपर्यंत मदत देत आहे. तर आता यापुढील काळात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या उपचारसाठी डेडिकेटेड रुग्णालय उभारणीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

दरम्यान, कोरोनावर उपचारांसाठी पोलिसांना गरज पडल्यास १ लाख रुपयांपर्यंत अग्रीम रक्कम मंजूर करण्यात आली आहे. त्यांना कुठल्याही रुग्णालयात महात्मा फुले आरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचारही घेता येतील, अशी माहितीही यावळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. त्यांनी यावेळी पुण्यात येरवडा येथील कोविड रुग्णालयाला भेट दिली तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Leave a Comment