CSRIच्या डॉक्टरांची दिलासादायक माहिती; आगामी काही महिन्यात उपलब्ध होईल कोरोना प्रतिबंधक औषध


नवी दिल्ली : देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होत असतानाच सर्वांना दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँन्ड इंडस्ट्रीयल रिसर्चचे (CSRI) महासंचालक शेखर मांडे यांनी आगामी काही महिन्यात कोरोना संसर्गावर एकदोन औषधे उपलब्ध होतील, अशी माहिती दिली आहे. पुन्हा हायड्रोक्सीक्लोरोक्विन औषधाचे प्रयोग करण्यास जागतिक आरोग्य संघटनेने परवानगी दिली आहे. ही बाब सर्वांसाठी आनंदाची आहे. यासंर्दभात एक लेख लॅन्सेट नावाच्या जर्नलमध्ये छापून आला होता. डब्लूएचओने त्याच्या आधारावर या औषधाचा प्रयोग करण्यास निर्बंध लावल्याचे डॉ. मांडे यांनी सांगितले.

हायड्रोक्सीक्लोरोक्विन औषधाची कोरोना संसर्गावर क्लिनिकल ट्रायल थांबवण्यास जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले होते. पण हे प्रयोग करण्यास आता पुन्हा एकदा परवानगी दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचा हायड्रोक्सीक्लोरोक्विनबाबत यु टर्न नेमका कशामुळे असे विचारल्यानंतर डॉ. मांडे म्हणाले की, लॅन्सेट नावाच्या जर्नलमध्ये एक लेख छापून आला होता. त्यात निरीक्षण संशोधन होते आणि त्याचे निरीक्षण त्यात छापले होते. त्यानंतर आम्ही डब्ल्यूएचओ आणि लॅन्सेट या दोघांना पत्रे लिहिली. या पेपरमध्ये गडबड असल्याचे सांगितले. त्याचे स्टॅटिस्टिक्स का चुकीचे आहे हे आम्ही समजावून सांगितले. केवळ भारतच नव्हे तर इतर ठिकाणीही या पेपरच्या विरोधात आवाज उठवला गेला.

फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड यासारख्या अनेक देशांनी लँसेटच्या पेपरनंतर ट्रायल थांबवले होते. हा निर्णय आमच्या मते अत्यंत चुकीचा होता. जे आरोप हायड्रोक्सीक्लोरोक्वविन बाबत केले ते वैज्ञानिक दृष्ट्या चुकीचे होते. लॅन्सेटमध्ये विरोधातील हा पेपर लवकरच मागे घेतला जाईल, हे तुम्ही बघाल, असा विश्वास शेखर मांडे यांनी व्यक्त केला. आयसीएमआरच्या मते हायड्रोक्लोरिकनचा चांगला उपयोग होतो आहे. आपल्याकडे रेमडीसीवीर बाबतही प्रयोग सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

हायड्रोक्सीक्लोरोक्वविन हे औषध सुरक्षित आहे, पण ते डॉक्टरांच्या सल्लाशिवाय घेऊ नये, असाही महत्वाचा सल्ला त्यांनी दिला आहे. टाटा आणि रिलायन्स या दोन कंपन्यांच्या सहकार्याने टेस्टिंग किटबाबत दोन नवे मॉडेल डेव्हलप केले आहेत. ते लवकरच बाजारात उपलब्ध होतील. शिवाय यामुळे कोरोना चाचणीचा खर्च कमी होईल, असेही ते म्हणाले. त्याचबरोबर आगामी दोन ते तीन महिन्यात एक किंवा दोन औषध आपल्या हातात आलेली असतील अशीही माहिती डॉ. शेखर मांडे यांनी दिली.

Leave a Comment