जगभरातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात काल एका दिवसात सव्वा लाखाची वाढ


मुंबई : जगभरातील बहुतांश देशांमध्ये कोरोनाचा कहर अद्याप कायम असून जगभरातील कोरोनाबाधितांची आकडेवारी 66.98 लाखांच्या घरात पोहचली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मागील 24 तासात जगभरातील 213 देशांमध्ये जवळपास एक लाख 29 हजार नवीन कोरोनाबाधित रुग्ण समोर आले आहेत, तर मागील 24 तासात कोरोनामुळे 5499 जणांचा बळी गेला आहे. यासंदर्भात वर्ल्डोमीटरने दिलेल्या आकडेवारीनुसार जगभरातील 66.98 लाख लोकांना जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण झाली आहे, तर आतापर्यंत या जीवघेण्या व्हायरसने 3 लाख 92 हजार लोकांचा बळी घेतला आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरातील 32 लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे. जगातील 76 टक्के कोरोनाबाधित हे केवळ 14 देशांमध्येच आहेत. या बारा देशांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 51 लाखांच्या घरात आहे.

वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार भारत कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीत जगात सातव्या स्थानावर आहे. भारतात कोरोनाचे 2,26,713 रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे 6,363 बळी गेले आहेत. सध्या भारतात 1,11,900 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 1,08,450 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

अमेरिकेला जगात सर्वाधिक कोरोनाचा फटका बसला आहे. अमेरिकेत 19,23,887 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 1,10,173 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर यूकेमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यूकेत कोरोनामुळे 39,904 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर तिथे कोरोनाबाधितांची संख्या 2,81,661 एवढी आहे. अमेरिकेनंतर ब्राझील कोरोनाबाधितांच्या आकड्यांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. ब्राझीलमध्ये 6,15,870 कोरोनाबाधित आहेत तर 34,039 लोकांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये कोरोनामुळे 27,133 लोकांचा मृत्यू झाला आहे. 2,87,740 लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 33,689 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 2,34,013हजार एवढा आहे.

अमेरिका, स्पेन, रशिया, ब्राझिल, यूके, इटली, भारत हे सात देश असे आहेत ज्या देशांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा दोन लाखांच्या वर गेला आहे. तर अमेरिकेत एक लाखाहून अधिक बळी गेले आहेत. इटली, ब्रिटन, ब्राझील या देशांमध्ये 30 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू कोरानामुळं झाला आहे.

Leave a Comment