मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरज्या नियम अटी राज्य सरकारने घालून दिल्या आहेत त्यात सर्वांसाठीचे नियम आहेत. त्यातील सेट आणि लोकेशनबद्दलच्या तिसऱ्या मुद्द्यातल्या 16 व्या नियमाने अमिताभ बच्चन यांच्यासारख्या अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ कलाकार, दिग्दर्शक, लेखक, तंत्रज्ञांना चित्रिकरणापासून दूर राहायला सांगण्यात आले आहे. कारण या नियमानुसार 65 वर्षावरील कोणीही तंत्रज्ञ, कलाकार यांना सेटवर येण्यास मज्जाव असणार आहे. ज्येष्ठ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे हा नियम बनवण्यात आला आहे.
सरकारच्या एका नियमामुळे ज्येष्ठ कलाकारांची गोची
सध्या टीव्हीवर कौन बनेगा करोडपतीचे प्रोमो दाखवले जात आहेत. अमिताभ बच्चन यांनी घरातून हे प्रोमो शूट केले आणि ते टीव्हीवर चालवले जात आहे. त्यातच सरकारने चित्रिकरणाला परवानगी दिल्यानंतर कौन बनेगा करोडपतीसह अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या. पण या नियम अटींमधील एका अटीने अमिताभ बच्चन यांची गोची केली आहे. या अटीनुसार अमिताभ बच्चन यांना तूर्त चित्रिकरण करता येणार नाही. म्हणूनच बच्चन साहेबांना चित्रिकरण करायचे असेल तर अजून किमान दोन महिने थांबावे लागणार आहे.
केवळ अमिताभ बच्चन यांनाच नव्हे, तर अनुपम खेर, अन्नू कपूर, नसिरूद्दीन शाह, धर्मेंद्र, शक्ती कपूर, मिथून, पंकज कपूर, जॅकी श्रॉफ, डॅनी, दिलीप ताहिल, राकेश बेदी, कबीर बेदी यांच्यासह मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांना देखील चित्रिकरणापासून काही महिने लांबच राहावे लागणार आहे. हिंदीसोबतच मराठी कलाकारांचाही यात समावेश आहे. यात दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ, रवी पटवर्धन, अरूण नलावडे, शिवाजी साटम, सतीश पुळेकर आदी मान्यवरांचा समावेश होतो. अर्थात ही बात केवळ कलाकारांची नाही. तर यात दिग्दर्शक, लेखक देखील सामिल आहेत, दिग्दर्शक डेव्हिड धवन, अनिल शर्मा, सुभाष घई, महेश भट्ट, मणिरत्नम, प्रकाश झा, श्याम बेनेगल, विधूविनोद चोप्रा, प्रियदर्शन, गुलजार, शेखर कपूर, जावेद अख्तर आदींना चित्रिकरण करता येणार नाही.
दरम्यान हिंदी सिनेवर्तुळातील दिग्दर्शकांच्या असोसिएशनने या एका नियमाचा फेरविचार करा अशा आशयाचे पत्र दिले आहे. तर मराठी चित्रपट महामंडळामध्येही याबाबत लवकरच बैठक होणार आहे. हे नियम कलाकारांच्या काळजीपोटीच घेण्यात आले असून, आणखी थोडे दिवस थांबायला हरकत नाही असे काहींचे म्हणणे आहे. तर जे मोठे कलाकार अनेक मोठ्या प्रोजेक्टमध्ये आहेत त्यांच्याबद्दल काही निर्णय घेता येतो का यावर चित्रपट महामंडळाच्या बैठकीत निर्णय होणार आहे.
कलाकारांच्या काळजीपोटीच सर्व नियम घेण्यात आले आहेत. 65 वर्षावरची अट ही केंद्राचीच आहे, कारण आपल्या सगळ्यांना माहीत आहे की सिनिअर सिटीझन्स हे कोरोनासाठी हायरिस्कवर असल्यामुळेच हा नियम केला आहे. शिवाय प्रश्न फक्त पुढच्या काही महिन्यांचा आहे. त्यामुळे सर्वांनीच सबुरीने घ्यायला हरकत नाही, असे मत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या एका अधिकाऱ्याने नोंदवले आहे.