गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय; तबलिगी जमातीच्या परदेशी सदस्यांना १० वर्षांसाठी भारतात प्रवेश बंदी


नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्रालयाने दिल्लीच्या निझामुद्दीन परिसरातील तबलिगी जमातीच्या २५५० परदेशी सदस्यांना काळ्या यादीत टाकले आहे. १० वर्षांसाठी या सर्वांवर भारतात प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. तबलिगी मरकजमधील धार्मिक कार्यक्रमात मार्च महिन्यात सहभागी झालेल्या परदेशी नागरिकांनी व्हिसा शर्तीचे उल्लंघन केल्याने याआधीदेखील त्यांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.

या तबलिगी मरकजमधील धार्मिक कार्यक्रमास एकूण आठ हजार लोक उपस्थित होते. त्यांच्यातील अनेकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसली आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्यांपैकी अनेकजण कोरोनाबाधित असल्याचे चाचण्यांमधून स्पष्ट झाले होते. पर्यटक व्हिसावर जे लोक आले होते व तरीही ते निझामुद्दीन येथील कार्यक्रमास उपस्थित राहिले त्यांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. कारण व्हिसा अटींच्या निर्बंधांचे त्यांनी उल्लंघन केले होते.

काळ्या यादीत ज्यांना टाकण्यात आले आहे, त्यांना आता पुन्हा भारतात प्रवेश मिळणार नाही. याआधी कारवाई करण्यात आल्यानंतर पोलिसांनी माहिती देताना एकूण २८१ परदेशी नागरिक हे निझामुद्दीन परिसरात दोन दिवस उपस्थित होते असे सांगितले होते. त्यात नेपाळ १९, मलेशिया २०, अफगाणिस्तान १, म्यानमार ३३, अल्जेरिया १, दिजबौती १, किर्गिझस्तान २८, इंडोनेशिया ७२, थायलंड ७, श्रीलंका ७२, बांगलादेश १९, इंग्लंड ३, सिंगापूर १, फिजी ४, फ्रान्स १, कुवेत १ या प्रमाणे नागरिक उपस्थित होते. पर्यटक व्हिसावर हे सर्व परदेशी लोक आले व धार्मिक कार्यक्रमात सामील झाले होते.

दिल्ली पोलिसांनी या विदेशी नागरिकांविरुद्ध व्हिसाच्या अटींचे उल्लंघन करून दिल्लीच्या निझामुद्दीन मरकज येथील धार्मिक मेळाव्यात सहभागी झाल्याबद्दल, बेकायदेशीरीत्या धर्मप्रचाराच्या उपक्रमांत भाग घेतल्याबद्दल आणि देशात कोरोनाचा प्रादुर्भाव केल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा भंग केल्याबद्दल आरोपपत्रे सादर केली आहेत.

Leave a Comment