राज्याच्या आरोग्य खात्याची मुंबईतील प्रसिद्ध चार रुग्णालयांना नोटीस


मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू असलेल्या साथ रोग नियंत्रण कायद्यांतर्गत खासगी रुग्णालयांना 80 टक्के बेड्स ठरवलेल्या दरात उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. पण काही उच्चभ्रु रुग्णालये बेडस् रिकामे असतानाही गरजूंना उपलब्ध करून देत नसल्याचे समोर आले होते. या प्रकारानांतर राज्याच्या आरोग्य विभागाने मुंबईतील हिंदुजा, जसलोक, बॉम्बे आणि लीलावती रुग्णालयांना नोटीस बजावली आहे. या रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

80 टक्के बेड्स उपलब्ध करुन देणे आणि गरीबांसाठी 10% बेड खासगी रुग्णालयांनी आरक्षित ठेवे नियमानुसार अपेक्षित आहे. पण खासगी रुग्णालयांकडून या आदेशाचे पालन होत नाही. या रुग्णालयांना काल रात्री आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अचानक भेट दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णालये चार्जेसचे चार्टही लावत नसल्याचे समोर आल्याने राज्य सरकारने ही कारवाई कारवाई केली आहे.

दिवसेंदिवस मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. हळूहळू सरकारी आणि महापालिकेच्या रुग्णालयांची क्षमता संपत असल्यामुळे मुंबईतील खासगी रुग्णालयांतील 80 टक्के बेड्स उपलब्ध करुन देण्याचे आदेश आहेत. मुंबईतील गरजू आणि गरीब रुग्णांना रुग्णालयांमध्ये बेड्स उपलब्ध झाले पाहिजेत. रुग्णालयांनी चार्जेसचा चार्ट लावला पाहिजे. रुग्णालयांना नोटीस पाठवून गरजूंना बेड्स मिळतात की नाही, आदेशांचे पालन होत आहे की नाही याची खात्री करून घेत आहेत. या रुग्णालयामध्ये रुग्णांना बेड उपलब्ध असतील तर ते मिळालेच पाहिजेत. आरोग्यमंत्री या नात्याने मी स्वत: रुग्णालयांना भेट दिली आणि हे सहन केला जाणार नाही, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला. तसेच रुग्णांना रुग्णालयांनी बेड्स उपलब्ध करुन दिले नाही, तर कायदेशीर कारवाई करु, असा इशाराही राजेश टोपे यांनी यावेळी दिला.

Leave a Comment