दिल्ली प्रदेशाध्यक्ष पदावरुन मनोज तिवारींची उचलबांगडी


नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाने मंगळवारी अनेक राज्यांचे प्रदेशाध्यक्ष नियुक्त केले असून त्यात दिल्लीच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन खासदार मनोज तिवारी यांची उचलबांगडी करत त्यांच्या जागी पक्षाने आदर्श कुमार गुप्ता यांना दिल्ली भाजपचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे. त्याचबरोबर पक्षाने छत्तीसगडची जबाबदारी विष्णुदेव साय यांच्याकडे सोपविली आहे. आदर्श गुप्ता उत्तर दिल्ली महानगरपालिकेचे माजी महापौर आहेत. मनोज तिवारी यांची 2016 मध्ये दिल्ली भाजप अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली होती. दिल्लीतील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती, असे सुत्रांचे म्हणणे आहे, परंतु त्यांच्याजागी पर्याय सापडत नसल्यामुळे त्यांनाच अध्यक्ष पदी कायम ठेवण्यात आले.

दिल्लीच्या 70 विधानसभा जागांमध्ये आम आदमी पक्षाला 62 जागा मिळाल्या. त्याच वेळी भारतीय जनता पार्टी (भाजप) केवळ 8 जागांवर विजय मिळवता आला होता. तर दुसरीकडे कॉंग्रेसला पुन्हा एकदा एकही जागा जिंकता आली नाही. प्रदेशाध्यक्ष पदावरून सुट्टी मिळाल्यानंतर मनोज तिवारी यांनी ट्विट केले की, भाजप प्रदेशाध्यक्षपदाच्या 3-6 वर्षांच्या कार्यकाळात मिळालेल्या प्रेमाची व पाठिंब्याबद्दल मी सर्व कार्यकर्ते, अधिकारी व दिल्लीतील जनतेचे आभार मानतो. अनावधानाने एखादी त्रुटी जाणवली असेल तर ल्याबद्दल क्षमस्व. नवीन प्रदेशाध्यक्ष आदर्श गुप्ता यांचे असंख्य अभिनंदन.

Leave a Comment