जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसवरील लस शोधण्याचे काम वैज्ञानिक करत आहेत. या संदर्भात चांगली बातमी आली असून, अमेरिकेतील एका कंपनीचे लसीचे ट्रायल दुसऱ्या टप्प्यात पोहचले आहे. चीनमध्ये देखील एक लसीचे दुसऱ्या टप्प्यातील ट्रायल पुर्ण झाले असून पुढील वर्षीच्या सुरूवातीला बाजारात येईल. चीनमध्ये आतापर्यंत पाच लसींचे मानवी ट्रायल करण्यात आले आहे. येथील कंपनी सिनोव्हॅक बायोटेकने दावा केला आहे की लस 99 टक्के परिणामकारक आहे. रशिया देखील आपल्या लसीचे क्लिनिकल ट्रायल पुढील दोन आठवड्यात सुरू करणार आहे.
आनंदाची बातमी : कोरोनाची एक लस दुसऱ्या टप्प्यात, दुसरी लस 99 % परिणामकारक

जगभरात सध्या 120 लसींवर काम सुरू असून, यातील 10 लसींचे मानवी ट्रायल सुरू आहे. आतापर्यंत ज्या लस परिणामकारक ठरल्या आहेत, त्यामध्ये कॅनसिनो अडेनोव्हायरस लस, ऑक्सफर्ड यूनिव्हर्सिटीची अडेनोव्हायरस लस, मोडेर्नाची एमआरएनए लस आणि नोव्हावॅक्सचा समावेश आहे.

अमेरिकेच्या मॉडेर्ना लसीने आशेचे किरण निर्माण केले आहेत. दुसऱ्या टप्प्यात वेगवेगळ्या वयोगटातील 500 निरोगी लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे. अमेरिकन कंपनीने सार्स-कोव्ह-2 व्हायरसच्या जेनेटिक मटेरियलचा वापर करून एमआरएनए लस तयार केली आहे. लस मनुष्याच्या शरीरात व्हायरसच्या प्रती इम्युन रिस्पाँस तयार करेल. पहिल्या टप्प्याच्या ट्रायलमध्ये प्रोटेक्टिव्ह अँटीबॉडीजची पुष्टी झाली होती.
चीन कोरोनावरील लसीच्या बाबतीत इतर देशांपेक्षा पुढे असून, आतापर्यंत 5 लसींचे मानवी ट्रायल केले आहे. बीजिंग इंस्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल प्रोडक्ट्स अँड चीन नॅशनल बायोटेक ग्रुप कंपनीच्या लसीने दुसऱ्या टप्प्यातील टेस्टिंग पुर्ण केले आहे.