केरळहून मुंबईच्या मदतीसाठी येणार डॉक्टर्स आणि नर्सेसची विशेष टीम


मुंबई – पुढच्या काही दिवसात केरळमधून ५० हून अधिक डॉक्टर्स आणि नर्सेस मुंबईत कोरोना व्हायरस विरुद्ध सुरु असलेल्या लढाईत मुंबईतील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी येणार आहेत. मुंबईला कोरोना रुग्णांवर उपचार करताना आणखी मनुष्यबळाची आवश्यकता आहे. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

सोमवारी केरळहून १६ डॉक्टरांची टीम मुंबईला पोहोचण्याची शक्यता असल्याचे डॉ. संतोष कुमार यांनी सांगितले. डॉ. संतोष कुमार हे तिरुअनंतपूरममधील सरकारी मेडिकल कॉलेजचे उपअधीक्षक आहेत. पुढच्या काही दिवसात मुंबईत केरळहून ५० डॉक्टर आणि १०० नर्सेस येतील असे कुमार यांनी सांगितले. हे सर्व डॉक्टर सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये काम करतील. वैद्यक कर्मचाऱ्यांसाठी ते सुरक्षित रुग्णालय आहे. केरळमधील खासगी क्षेत्रामध्ये मुंबईत मेडिकल स्टाफच्या मदतीसाठी येणारे डॉक्टर काम करतात आणि आपल्याच सहकाऱ्यांची मदत करण्यासाठी स्वच्छेने ते येत असल्याचे डॉ. संतोष कुमार यांनी सांगितले.

केरळ हे कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवणारे देशातील पहिले राज्य आहे. शिवाय तिथे मृत्यूदरही प्रचंड कमी आहे. सर्व सोयी-सुविधांनी अंधेरीमध्ये असलेले सेव्हन हिल्स हॉस्पिटल सुसज्ज आहे. ते वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा सुरक्षित असल्याचे संतोष कुमार यांनी सांगितले. त्याचबरोबर त्यांनी यावेळी केरळ आणि मुंबईमधील कोरोनाच्या परिस्थितीची तुलना करण्यास नकार दिला. मुंबईसारखी एकही जागा केरळमध्ये नाही. हे मोठे शहर असून येथील लोकसंख्या तीन कोटीच्या घरात आहे. इन्फेक्शन पसरण्याची दोन्ही ठिकाणी कारणे वेगवेगळी आहेत आणि कोरोनाचा सामना कसा करायचा त्याची रणनिती सुद्धा वेगळी असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment