लॉकडाउनच्या काळात जप्त केलेली वाहने परत देण्याचा पुणे पोलिसांचा निर्णय, पण ‘ही’ असेल अट!


पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी लॉकडाऊन सुरु असून सध्या आपण लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात आहोत. त्यातच केंद्र आणि राज्य सरकारने पाचव्या टप्प्यातील लॉकडाऊनच्या काही अटी शिथिल केल्यामुळे अनेक राज्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्यातच आता लॉकडाउनच्या काळात जप्त केलेली वाहने मालकांना परत देण्याचा पुणे पोलिसांनीही निर्णय घेतला आहे.

लॉकडाउनदरम्यान पुण्यात पोलिसांनी जप्त केलेल्या हजारो गाड्या पुणेकरांना आता न्यायालयात न जाताही परत मिळू शकणार आहेत. पण त्यासाठी प्रत्येक गाडीमागे अडीच हजारांचे सिक्युरिटी डिपॉझिट पुणे पोलिसांकडे भरावे लागणार असल्याची माहिती स्वत: पुणे पोलीस आयुक्त के व्यंकटेशम यांनी माहिती दिली आहे. यासंदर्भातील वृत्त न्यूज 18 लोकमतने दिले आहे.

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाउन करण्यात आला होता. त्याचबरोबर पोलीस आणि प्रशासनाकडून वारंवार लोकांनी रस्त्यावर गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात येत होते. पण, तरी देखील लोक विनाकारण रस्त्यावर बाहेर पडत असल्यामुळे पोलिसांनी कारवाई करत वाहने जप्त केली होती. लॉकडाउनचे उल्लघंन केल्या प्रकरणी पुण्यात गेल्या दोन महिन्यात तब्बल 47 हजार दुचाकी गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या सर्व गाड्या विविध पोलीस ठाण्यांच्या आवारात धूळ खात पडल्या आहेत. दरम्यान या गाड्या त्यांच्या मालकांना परत देण्याचा निर्णय पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी घेतला आहे. पुणेकरांना आयुक्तांच्या या निर्णयामुळे न्यायालयात न जाता आपले वाहन ताब्यात घेता येईल. त्यातच आता पोलीस आयुक्तांच्या या प्रस्तावाला पुणेकर कसा प्रतिसाद देतात हे काही दिवसातच स्पष्ट होईल.

Leave a Comment