जगभरातील टॉप-10 कोरोनाबाधित देशांच्या यादीत दहाव्या स्थानी भारत


नवी दिल्ली : देशभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडेवारीत दिवसागणिक वाढच होत आहे. त्यातच आता देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 38 हजार 845च्या पार पोहचला त्याचबरोबर टॉप-10 कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत भारत दहाव्या स्थानावर पोहोचला आहे. गेल्या 24 तासात देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत 6 हजार 977 रुग्णांची वाढ झाली आहे. ही आतापर्यंतची सर्वाधिक वाढ आहे. तर मागील 24 तासात 154 मृत्यूमुखी पडले. याबाबत आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 4 हजार 21 जणांचा मृत्यू झाला असून 57 हजार 721 रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजेच देशाचा रिकव्हरी रेट 41.57 टक्के आहे. तर मागील 24 तासांत 3 हजार 280 कोरोनामुक्त झाले.भारतात सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण 77 हजार 103 आहे.

कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात झाला असून महाराष्ट्रात काल सर्वाधिक 3 हजार 41 कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. महाराष्ट्रात आता कोरोनाग्रस्तांचा आकडा 50 हजार 231 झाला आहे. त्यातील 14 हजार 600 बरे झाले. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट आहे 29.06 टक्के आहे. तर मृतांचा आकडा 1635 आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोनाची लागण असलेले रुग्ण 33 हजार 988 आहे. मुंबईत 30 हजार 542 कोरोनाबाधित असून त्यामधील 988 जणांचा मृत्यू झाला आहे.

तर केरळमध्ये 847 रुग्ण असून त्यातील 521 बरे झाले आहे. तर चौघांचा मृत्यू झाला आहे. केरळचा रिकव्हरी रेट 61.51 टक्के आहे. गेल्या दहा-बारा दिवसात केरळमध्ये रुग्णांची संख्या हळूहळू वाढत असल्यामुळे रिकव्हरी रेट 94 टक्क्यांवरुन 61 टक्क्यांवर आला आहे.

30 जानेवारी रोजी भारतात कोरोनाबाधित पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून आतापर्यंत एक लाख 38 हजार 845 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत भारताचा पहिल्या दहामध्ये समावेश झाला आहे. या यादीत अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. यानंतर ब्राझील, रशिया, स्पेन, ब्रिटन, इटली, फ्रान्स, जर्मनी आणि तुर्की या देशांचे क्रमांक येतात.

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू होऊन आज दोन महिने पूर्ण झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च रोजी पहिल्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. जो 25 मार्चपासून लागू झाला होता. यानंतर लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून तीन वेळा वाढवण्यात आला. सध्या काही शिथिलतांसह लॉकडाऊनचा चौथा टप्पा 31 मेपर्यंत सुरु राहिल.

Leave a Comment