शाहरुखच्या ‘बेताल’चा रिलीजचा मार्ग मोकळा


मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेता शाहरुख खान याला दिलासा देत त्याच्या रेड चिलीज अंतर्गत निर्माण झालेल्या ‘बेताल’ या आगामी वेब सीरिजच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने नेटफ्लिक्स आणि रेड चिलीज एंटरटेनमेंटविरोधातील कॉपीराइट प्रकरणात याचिकाकर्त्यांना तूर्तास कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे. रविवारी नेटफ्लिक्सवर जगभरात रिलीज होणा-या बेतालच्या प्रदर्शनावर स्थगिती घालण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात मराठी चित्रपटातील पटकथालेखक समीर वाडेकर आणि महेश गोसावी यांनी अॅड. विराज कदम यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती. या याचिकेतून आपण लिहिलेली ‘वेताळ’ ही पटकथा चोरल्याचा आरोप करण्यात आला होता.

यावर न्यायमूर्ती के. आर. श्रीराम यांच्यासमोर सुनावणी पार पडली. या कथेची नोंदणी साल 2015 मध्ये करून साल 2018 मध्ये या पटकथेचे स्वामित्व हक्कही असोसिएशनकडे नोंदणीकृत करण्यात आल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा आहे. जेव्हा 7 मे रोजी नेटफ्लिक्सवर ‘बेताल’चा ट्रेलर रिलीज झाला तेव्हा त्याच्यात आणि आपल्या मुळ कथेतील पात्र, स्थान इ. बाबीत समानता असल्याचे आपल्या लक्षात आल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्यावतीने करण्यात आला. तसेच आपण या वेब सीरीजच्या एका निर्मात्याच्या संपर्कात होतो. आपण आपली कथा त्याला ऐकवली होती, तसेच यावर एक सिनेमा बनवण्याची तयारीही त्याने दाखवली होती, अशी माहिती याचिकाकर्त्यांनी दिली.

पण रेड चिलीज एंटरटेनमेंटच्यावतीने बाजू मांडताना अॅड हिरेन कमोद यांनी ‘बेताल’ ही वेब सीरीज कल्पनिक असल्याचा दावा केला. तर नेटफ्लिक्सच्यावतीनेही याचिकाकर्त्यांचा दावा फेटाळण्यात आला. विक्रम आणि वेताळच्या कथा या सर्वांनी लहानपणापासून ऐकलेल्या आहेत. त्यामुळे त्या संकल्पनेवर कुणीही आपला दावा सांगू शकत नाही, असा त्यांचा दावा होता. सर्व पक्षकारांचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने ‘बेताल’ वेबसिरीसला स्थगिती देण्याची मागणी फेटाळून लावली.

Leave a Comment